Amit Shah in Kashmir Sarkarnama
देश

बुलेट प्रुफ काचेचे संरक्षण हटवून अमित शहांचा काश्मिरी युवकांशी थेट संवाद

कलम 370 (Article 370) हटविल्यानंतर अमित शहा (Amit Shah) यांचा पहिलाच काश्मीर खोऱ्यात दौरा

पीटीआय

श्रीनगर : ‘‘जम्मू-काश्‍मीरच्या जनतेशी विशेषतः युवकांशी बोलण्यास मी तयार आहे. तसेच पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला देणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला चढवत जर मी कोणाची बोलेन तर ते फक्त जम्मू-काश्‍मीरचे नागरिक व युवकांशीच, अन्य कोणाशीही चर्चा करणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सोमवारी केले.

शहा यांची आज शेर -ए- काश्‍मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) जाहीर सभा झाली. ते म्हणाले ‘‘मी आज मनापासून बोलत आहे. माझ्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला जात आहे. बुलेट प्रुफ काचेचे संरक्षण हटवून मी आज बोलत आहे काश्‍मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतरचा हा माझा पहिलाच काश्‍मीर दौरा आहे. काश्‍मीरमध्ये संचारबंदी का लागू केली आणि इंटरनेट सेवा का बंद केली , असे प्रश्‍न मला नेहमी विचारण्यात येतात. आज मी याचे उत्तर देतो. आपल्या युवा पिढीच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या जीव वाचविण्यासाठी असे हे करावे लागले. यात आमचा कोणताही स्वार्थ नाही. येथील परिस्थितीचा फायदा घेण्याची संधी विध्वंसक वृत्तींना मिळू नये आणि आपल्या मुलांना रस्त्यावर येऊन गोळ्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावे लागले.’’

नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी)वर हल्ला चढवत शहा म्हणाले की, काश्मिरी नागरिकांचा जीव घेणाऱ्यांचा या दोन्ही पक्षांनी कधीही निषेध केलेला नाही. दहशतवाद्यांना परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे दिवस गेले आहेत. आता कोणीही नागरिकांचा जीव घेऊ शकत नाही. जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता अबाधित राहील, अशी ग्वाही मी देतो. ३७० वे कलम रद्द केल्यानंतर येथील नागरिकांचा रोजगार व जमीन हिरावून घेतली जाईल, अशा अफवा पसरविल्या जात होत्या, पण कोणत्याही गावातील एका तरी ग्रामस्थाची जमीन हिसकावली असल्याचे एक तरी उदाहरण मला द्या, असे आव्हान देत नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्‍मीरमध्ये २० हजार रोजगार निर्मिती झाली असून अजून सहा हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. पण पूर्वीच्या सरकारप्रमाणे विशेषतः ७० वर्षे राज्य केलेल्या दोन कुटुंबांच्या परंपरेनुसार नाही तर जे खरेच लायक आहेत, त्‍यांनाच रोजगार मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

युवकांना आवाहन

‘‘ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले, त्यांनी तुमचे काय भले केले?, ज्यांनी तुमच्या हातात शस्त्रे दिली, त्यांनी तुमच्यासाठी काय केले? ते त्यांच्या स्वार्थासाठी काश्मिरी युवकांचे भविष्य नासवत आहेत. आज नवा काश्‍मीर तुमच्या समोर आहे. आज ३० हजार लोक लोकशाही पद्धतीने काश्मिरी जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आणि अनेक पातळ्यांवर लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन मी येथील युवकांना करीत आहे,’’ असे शहा म्हणाले. ‘‘येथे असे मुख्यमंत्री होते, जे लोकांना अडचणीत सोडून स्वतः दरवर्षी सहा महिने लंडनला राहत असत. आता आपले युवक सरपंच, पंच, आणि अन्य पदांवर आहेत. ते पुढे खासदार, आमदार आणि मुख्यमंत्रीही होतील. जनतेबरोबर राहील असा मुख्यमंत्री जम्मू-काश्‍मीरला मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

क्षीरभवानी मंदिरात पूजा

‘एसकेआयसीसी’मधील कार्यक्रमापूर्वी अमित शहा हे आज सकाळी गंदरबाल जिल्ह्यातील क्षीरभवानी मंदिरात पूजा केली. त्‍यावेळी त्यांनी काश्‍मीरचे पारंपारिक फेरन परिधान केले होते. शहा यांनी माता राग्यादेवीचे पूजन केले. त्यांच्यासमवेत जम्मू-काश्‍मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हेही उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT