Jitin Prasad, Anandiben Patel File Photo
देश

भाजपनं चार नेत्यांची नावं पाठवताच राज्यपालांची काही मिनिटांतच सही!

सत्ताधारी भाजपने प्रसाद यांच्यासह चार नेत्यांची नावं राज्यपालांकडं पाठवली. त्यावर राज्यपालांनी आपली मोहोरही उमटवली आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनऊ : पंजाबपाठोपाठ उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही रविवारी सायंकाळी पार पडला. यामध्ये सात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले जितिन प्रसाद यांचाही यामध्ये समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेताना ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. पण त्यानंतर काही मिनिटांतच सत्ताधारी भाजपने प्रसाद यांच्यासह चार नेत्यांची नावं राज्यपालांकडं पाठवली. त्यावर राज्यपालांनी आपली मोहोरही उमटवली आहे.

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी रविवारी सात नवीन मंत्र्यांना शपथ दिली. जितिन प्रसाद यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर छत्रपाल गंगवार, पलटूराम, संगीता बलवंत बिंद, संजीव कुमार गोंड, दिनेश खटीक, धर्मवीर प्रजापती आणि छत्रपाल सिंह गंगवार यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रसाद वगळता इतर सहाही जण आमदार आहेत. मागील अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

या विस्तारामध्ये भाजपचा पक्ष असलेल्या निषाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यांना या विस्तारात स्थान मिळालं नाही. मात्र, त्यांना भाजपकडून विधान परिषदेत पाठवण्यात आलं आहे. प्रसाद यांच्यासह निषाद, गोपाल अंजान भुर्जी आणि चौधरी वीरेंद्र गुर्जर यांना विधान परिषदेचे सदस्य करण्यात आले आहे.

भाजपकडून सायंकाळी चौघांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्यपाल पटेल यांनी या चौघांच्याही नावांवर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे हे चौघे आता विधान परिषदेचे सदस्य असतील. प्रसाद हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे.

विस्तारात जातीय समीकरण साधलं

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जातीय समीकरणं साधली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योगींना ही कसरत करावी लागली आहे. विस्तारामध्ये तीन मंत्री ओबीसी, एक ब्राम्हण, दोन एससी आणि एक एसटी वर्गातील आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT