Chandrababu Naidu, Narendra Modi Sarkarnama
देश

Chandrababu Naidu : चंद्राबाबूंनी दिल्ली पालथी घातली; मोदींकडून ‘गिफ्ट’ मिळणार की पुन्हा निराशा?

Rajanand More

New Delhi : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दोन दिवसांत संपूर्ण दिल्ली पालथी घालत अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट मागण्यांची लांबलचक लिस्ट दिल्याची चर्चा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विशेष पॅकेजची मागणी असल्याचे समजते.

चंद्राबाबू यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि नायडू यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्याआधीच रेड्डी यांनी दिल्लीवारी करत मोदींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे आंध्र प्रदेशसाठी विविध योजना व निधी मागणी केल्याची चर्चा आहे.

मोदींनंतर नायडू यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, पियुष गोयल, हरदीप सिंग पुरी, मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, जे. पी. नड्डा यांच्यासह इतरही काही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. एनडीए सरकारमध्ये नायडूंना मोठे महत्व आहे. यापार्श्वभूमीवर नायडूंचा दिल्लीतील झंझावत चर्चेचा विषय बनला आहे. राज्याल विशेष पॅकेज मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

आंध्रला हवेत 13 लाख कोटी

नायडूंनी मोदींकडे सुमारे 13 लाख कोटींच्या कर्जाची मागणी केल्याचे समजते. त्याचप्रमाणे जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात विविध योजनांचे रखडलेले काम आणि निधी पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रामुख्याने राज्याची राजधानी म्हणून अमरावतीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे मोठे आव्हान रेड्डींसमोर आहे.

नायडूंचे दबावतंत्र

केंद्र सरकारमध्ये नायडू यांचे वजन वाढले आहे. त्यांच्या पाठिंब्यांवर केंद्र सरकार तग धरून असल्याने मोदींना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नायडू यांनी दिल्लीवारी करत केलेल्या मागण्यांबाबत केंद्राला सकारात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.

नायडू यापुर्वीही एनडीएमध्ये असताना त्यांनी विशेष पॅकेजची मागणी केली होती. पण ती मान्य न झाल्याने ते बाहेर पडले होते. मात्र, त्यावेळची स्थिती वेगळी होती. भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली होती. आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे आता मोदी नायडूंना मोठं गिफ्ट देणार की पुन्हा पदरी निराशा पडणार, हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT