Jagan Mohan Reddy, Chandrababu Naidu Sarkarnama
देश

Jagan Mohan Reddy : जगनमोहन रेड्डींना जोरदार झटका; चंद्राबाबू राज्यसभेत फोडणार भोपळा

Rajanand More

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी गुरूवारी जोरदार झटका दिला. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर चंद्राबाबूंनी जगनमोहन यांच्या पक्ष खिळखिळा करण्यास सुरूवात केली आहे.

जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसच्या राज्यसभेच्या दोन खासदारांनी गुरूवारी तडकाफडकी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हे दोन्ही नेते आता नायडूंच्या तेलुगू देसम पक्षात प्रवेश करणार आहेत. मोपीदेवी वेंकटरमण आणि बेदा मस्तान राव अशी या खासदारांची नावे आहेत.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दोघांचा राजीनामा मंजूर केल्याचे समजते. वेंकटरमण यांचा कार्यकाळ जून 2026 तर राव यांचा कार्यकाळ जून 2028 पर्यंत होता. दोघांच्या राजीनाम्यामुळे रेड्डींना मोठा धक्का बसला आहे. कारण लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाच्या पदरी निराशा पडली होती. लोकसभेपेक्षा राज्यसभेत त्यांचे खासदार जास्त होते.

जगनमोहन यांचे लोकसभेत केवळ चार खासदार आहेत. तर आता राज्यसभेतही नऊ खासदार राहिले आहेत. तर दुसरीकडे लोकसभेत चांगली कामगिरी केलेल्या बाबूंचा राज्यसभेत एकही खासदार नव्हता. आता राजीनामा दिलेल्या रेड्डींच्या दोन नेत्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवून नायडू राज्यसभेत खाते उघडतील. त्याचा एनडीएलाही फायदा होणार आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत एनडीएचे 11 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे एनडीएला राज्यसभेत काठावर बहुमत मिळाले. आता आणखी दोन खासदार वाढल्यास पंतप्रधान नरेंद्र मोंदी आणि त्यांच्या सरकारची राज्यसभेतील ताकद वाढणार आहे. तर विरोधकांची ताकद आपोआप कमी होईल.

बहुमत नसताना मोदींना मदत

जगनमोहन यांच्या पक्षाचे राज्यसभेत 11 खासदार होते. त्यामुळे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना भलतेच महत्व आले होते. सरकारकडे बहुमत नसल्याने महत्वाची बिले पारित करण्यासाठी अनेकदा रेड्डींचे खासदार मदतीला यायचे. त्यांनी उघडपणे सरकारला पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभेतील सत्ता गेल्यानंतर वायएसआर काँग्रेसने सरकारविरोधी भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT