YS Sharmila, Jagan Mohan Reddy Sarkarnama
देश

Jagan Mohan Vs Sharmila : 'वायएस' नव्हे 'मोरुसुपल्ली' शर्मिला! जगनमोहन यांनी दाखवला ‘सासर’चा रस्ता

YS Sharmila : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावा-बहिणीतील वाद वाढला...

Anand Surwase

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय.एस शर्मिला आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या बहीण-भावातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शर्मिला यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार घेताच वाय.एस. शर्मिला यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी केलेली टीका वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांच्याकडूनही सोशल मीडियावर शर्मिलांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

जगन रेड्डी असा उल्लेख

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच वाय. एस. शर्मिला (YS Sharmila) यांनी, माझे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी दोनवेळा काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष पद सांभाळले होते. तसेच ते दोन वेळा मुख्यमंत्री होते. त्यानंतर आता पक्ष नेतृत्वाने मला ही संधी दिली आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ करेन, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस नेत्यांचे आभार मानले. याचवेळी शर्मिला यांनी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारवर निशाणा साधताना जगन मोहन रेड्डी यांच्यावर टिकेची झोड उठवली.

जगन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी मुख्यमंत्री म्हणून केवळ आंध्र प्रदेशला कर्जात ढकलण्याचे काम केले आहे, आता या सरकारकडे विकास कामासाठी पैसाच शिल्लक नसल्याचा आरोप केला. दरम्यान ही टीका करत असताना शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांचा उल्लेख हा केवळ "जगन रेड्डी" असा केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मोरुसुपल्ली काय आहे प्रकरण?

वाय. एस. शर्मिला यांचा 'जगन रेड्डी' हा उल्लेख वायएसआर काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यांच्याकडून शर्मिला यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यासाठी वाएसआर काँग्रेसकडून सोशल मीडिया वाय एस शर्मिला यांच्या नावाचा उल्लेख हा मोरुसुपल्ली शर्मिला (#MorusupalliSharmila) असा करण्यात आला. त्यांच्या नावापुढील वाय. एस. हे नाव काढत शर्मिला यांचे सासरचे आडनाव जोडण्यात आले. ज्यावेळी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जगनमोहन रेड्डी यांना अटक झाली होती. त्यावेळी वाय. एस. शर्मिला यांनी भावासाठी राज्यभर दौरा केला होता. त्यावेळी जनतेतही त्यांचा उल्लेख वाय. एस. शर्मिला असाच केला जात होता. मात्र आता शर्मिला यांचा उल्लेख मोरुसुपल्ली शर्मिला असा करत त्यांचा आंध्रशी काहीही संबंध नसल्याचे सूचित करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शर्मिला यांनी जगनमोहन रेड्डी यांना तिचा शत्रू म्हणून उल्लेख केल्याने वायएसआर काँग्रेसने सोशल मीडियावर मोरुसुपल्ली शर्मिला अशा ट्रेंडचा चालवला आहे. तसेच तिला बाहेरची व्यक्ती संबोधित केले जाऊ लागले आहे. यासाठी सोशल मीडियावर शर्मिला यांनी तेलंगणाच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या भाषणांचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये शर्मिला यांनी माझा आंध्र प्रदेशशी कोणताही संबंध नाही, मी तेलंगणाची सून असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून आता वायएसआर काँग्रेसने मोरुसुपल्ली शर्मिला या तेलंगणाच्या महिला आहेत आणि त्यांना आंध्र प्रदेशेच्या राजकारणावर काहीही बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका करण्यात येत आहे.

साक्षी माध्यम समुहाने केले बदल

आंध्र आणि तेलंगणामध्ये साक्षी माध्यम समुह हा जगनमोहन रेड्डी यांच्या मालकीचा आहे. शर्मिला यांनी जगन रेड्डी असा उल्लेख करताच साक्षी न्यूज पेपरने देखील वाय.एस. शर्मिला यांचा उल्लेख केवळ शर्मिला असा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या बहिण भावाचे राजकारण आगामी काळात आणखी स्फोटक होण्याची चिन्हे असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

आंध्र प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ जुनमध्ये समाप्त होत आहे. त्यामुळे या राज्यात एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. शर्मिला यांना सुरुवातीला वडिलांच्या नावावर तेलंगणामध्ये पक्ष सुरू करून स्वत:चे अस्तित्व निर्माण करता येईल वाटत होते. मात्र त्यांचा अंदाज चुकीचा ठरला. आता त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करत आंध्र प्रदेशमध्ये भाऊ जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. शर्मिला यांचा काँग्रेस प्रवेश आणि आंध्रप्रदेशच्या राजकारणात सक्रीय होणे हे जगनमोहन यांच्या पक्षाला निश्चितच आव्हान देणारे ठरणार आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही बहीण भावामध्ये सोशल मीडिया वार सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT