Bal Thackeray: 'मार्मिक'पणा हा बाळासाहेबांच्या स्वभावातच मुरलेला...; इंदिराजी, पवारांनीही त्यांचं कौतुकच केलं...

Bal Thackeray Birth Anniversary: पंचवीस-तीस वर्षांपूर्वी अभिव्यक्तीस्वातंत्र्य अधिक होतं...
Bal Thackeray Birth Anniversary:
Bal Thackeray Birth Anniversary:(व्यंगचित्र 'फटकारे' या पुस्तकातून साभार)
Published on
Updated on

मल्हार जयकर

"बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांत एकीकडे रांगडेपण आहे आणि लुसलुशीत, अकृत्रिम अशी नजाकतसुद्धा! काळ्या दगडावर पांढरी रेघ तसा बाळासाहेबांचा आकृतिबंध. कुठेही उधळमाधळ नाही. कारणाशिवाय एकाही रेषेची लुडबुड नाही. सगळं चित्र एकदम कसं रेखीव आणि आखीव! व्यंगचित्राची गेगलाईन चमकदार आणि टवटवीत. भाषा कधी कुरकुरीत, तर कधी करकरीत. कधी मोरपिसासारखी हळुवार, तर कधी चाकूच्या रेशीमपात्यासारखी...! विद्रोहाला कैकदा व्यंगाची मैत्री भावते असं म्हणतात, बाळासाहेबांबाबत हेच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची व्यंगचित्रं आणि त्याच्या कॅप्शन्सही याच कुळातलं. व्यंगाचा आधार घेऊन एका भेसूर, विद्रूप सत्याचं दर्शन घडवणारं! 'मी व्यंगचित्रकाराच्या हलकट नजरेतून सारं काही पाहतो,' असं बाळासाहेब अनेकदा म्हणत असत. खरं तर त्यांच्याकडं 'थ्री डायमेन्शनल' अशी नजर होती. आजूबाजूच्या भल्याबुऱ्या वास्तवातलं भेदक टिपणारी ही दृष्टी म्हणजे बाळासाहेबांचा 'तिसरा डोळा' !"

बाळासाहेब ठाकरे हे श्रेष्ठ दर्जाचे व्यंगचित्रकार होते. ते केवळ महाराष्ट्रातले, देशातलेच नाही, तर जागतिकस्तरावर ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ओळखले गेले. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात मारलेल्या फटकाऱ्यात, अग्रलेखापेक्षा अधिक अर्थपूर्णता होती, मार्मिकता होती आणि चिमटेही होते. त्यांच्या व्यंगचित्रांना जागतिक मान्यता मिळाली, पण त्यांच्या व्यंगचित्रकारितेची योग्य ती कदर करण्यात महाराष्ट्राने करंटेपणाच दाखविला, असं खेदानं म्हणावं लागतं.

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेचे शिक्षण कोणत्याही एका आर्ट स्कूलमध्ये झाले नाही. त्यांचा जन्मजात कल चित्रकलेकडे आणि व्यंगचित्रकलेकडे होता. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांची चित्रं पाहून त्यांना आर्ट स्कूलमध्ये दाखल करणार होते. पण त्यांचे मित्र बाबूराव पेंटर यांनी प्रबोधनकारांना सांगितलं, 'दादा, मुलगा चित्रकार व्हायला हवा असेल तर त्याला आर्ट स्कूलमध्ये दाखल करू नका!' मग प्रबोधनकारांनी आपल्या नजरेखालीच बाळासाहेबांची व्यंगचित्रकलेची साधना सुरू झाली. त्याकाळी दादांची आंदोलने, समाजकार्य, लेखन, व्याख्याने सुरू होती. त्यामुळे बाळासाहेबांनी घरीच एकलव्याप्रमाणे व्यंगचित्रकलेची साधना केली. त्यात त्यांचे 'द्रोणाचार्य' होते, डेव्हिड लो, बॅन बेरी, दीनानाथ दलाल आणि त्यांचे वडील!

Bal Thackeray Birth Anniversary:
Bal Thackeray Birth Anniversary: बाळासाहेबांपुढं मस्तक झुकवण्यातसुद्धा थरार होता...

ठाम, ठोस, स्वच्छ व्यंगचित्रं...

शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी जी चळवळ बाळासाहेब मार्मिकमधून चालवीत होते. त्याने अनेक तरुण प्रभावित झाले होते, त्यापैकी मीसुद्धा होतो. मार्मिकमध्ये माझे आवडते सदर म्हणजे 'रविवारची जत्रा'! अंकातल्या मधल्या दोन पानांवर बाळासाहेबांनी रेखाटलेली पाच-सहा व्यंगचित्रं असत. त्यांचे विषय प्रामुख्यानं राजकारणातले असत. ते जाणून घेणे खूपच औत्सुक्याचे होते. मराठी माणसांच्या न्याय हक्काच्या चळवळीनं जसे तरुण आकर्षित झाले होते तशीच काही मंडळी व्यंगचित्रातूनही बाळासाहेबांकडे आकर्षित झाले होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या त्यावेळच्या दादरच्या घराबाहेर गर्दी होत असे. त्या गर्दीत मी एक होतो. बाळासाहेबांचं दादरचे ते छोटंसं घर, त्या घराच्या मागच्या बाजूला छोटीशी पडवी होती, आजूबाजूला हिरवंगार वातावरण, त्यातही डवरलेला हिरवा चाफा. यांच्या सान्निध्यात बाळासाहेब बऱ्याचदा याच पडवीत मांडी घालून व्यंगचित्रं काढायला बसत.

चित्र काढण्यासाठीचा बोर्ड, पेन्सिल, पांढरा स्वच्छ कागद, काळीभोर शाई, ब्रश, चारकोल हे त्यांचं सामान. पांढरा स्वच्छ कागद त्यावर ब्रशने फटकारे मारल्यावर जिवंत होई, ते पाहताना विलक्षण मजा यायची. एकदा का फटकारा मारला की मारला! पुन्हा रिटचिंग नाही. ठाम विचार स्पष्ट कल्पना, स्वच्छ चित्रांकन आणि आत्मविश्वासानं मारलेले फटकारे हे त्यांचे वैशिष्ट्य! त्या काळातले राजकारणी त्यांच्या गुणदोषासहित आम्हाला समजायचे. हा राजकारणी गमतीशीर आहे, हा नेता बदमाश वाटतो, हा कपटी आहे, हा खडूस, हा लुच्चा दिसतो... हा साधा सरळ, याचे डोळे घारे आहेत, याचं नाक मोठं आहे, याची कारणं मजेशीर आहेत. एवढं कशाला, ती व्यक्ती अगदी पाठमोरी असली तरी ओळखता यायची. कोणतीही व्यक्ती कोणत्याही अँगलने तिच्या हावभावासह रेखाटण्यात त्यांचा हातखंडा! चित्रात जवळच्या अंतरावरचे, दूरचे, मागे पुढे असल्याचा अंतराचा आभास कमीत कमी रेषांत ते लीलया दाखवीत. 'मार्मिक'पणा हा त्यांचा स्वभावातच मुरलेला त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, घटना, घडामोडी याकडे त्याच दृष्टीनं पाहत असत.

'महाराष्ट्रसेवक' बाळासाहेब

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अस्तित्वात आला तरी मराठी आणि मराठी तरुणांवरील अन्याय दूर झालेला नव्हता. ही मराठी माणसाची दुखरी नस बाळासाहेबांनी पकडली. मार्मिक सुरू झाल्यानंतर त्या मराठीच्या जखमेला त्यांनी वाट करून दिली. मुंबईत मराठी माणसाला नोकऱ्या न मिळणे, सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या इथं वरिष्ठ व्यवस्थापक हे दक्षिण भारतीय असल्याने ते मराठी तरुणांची भरती करण्याऐवजी त्यांच्या प्रांतातील म्हणजेच दक्षिणेकडील तरुणांची भरती करीत. या विषयाचा त्यांनी मार्मिकमधून पाठपुरावा सुरू केला. ते मोठाल्या कंपन्यांत वरिष्ठ पदावर असलेल्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची नावेच मार्मिकमधून प्रसिद्ध करू लागले. ती वाचून मराठी तरुण त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. यातून चळवळ सुरू झाल्यासारखे वातावरण तयार झाले. यातून उदयास आली 'शिवसेना'! त्यावेळी बाळासाहेबांनी सूत्र ठरवले होते ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण! या सूत्रानुसार काम सुरू झाले. शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांनी स्वतःसाठी जे विशेषण वापरलं ते 'शिवसेनाप्रमुख' हे नव्हते, तर ते होते 'महाराष्ट्रसेवक'!

थेट व्यंगचित्रांची रंगत

बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रं अगदी थेट स्वरूपाची आहेत. त्या त्या व्यक्तीला उपहासाचा विषय बनवीत व्यंगचित्रं काढीत. आजही राजकीय व्यक्तींची व्यंगचित्रं प्रसिद्ध होत असतात. पण ती थेट नसतात, इनडायरेक्ट असतात. राजकीय व्यक्ती त्यात थेट दाखवलेल्या वा काढलेल्या नसतात. व्यक्तींवर थेट कॉमेंट्स नसते, असते ती अप्रत्यक्ष कॉमेंट! बाळासाहेबांनी व्यंगचित्रकारितेच्या काळात म्हणजे 1960 ते 1985 यादरम्यान काढलेली थेट व्यंगचित्रं बघितली की अग्रलेखाची ताकद असलेली व्यंगचित्रं यापुढच्या काळात बघायला मिळाली नाहीत, याची खंत वाटते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्यासंदर्भात जे विषय प्रथमपासून हाती घेतले त्यांचे स्वरूप आज फार मोठे झाले आहे. मुंबईचे नागरी प्रश्न, पाकिस्तानच्या कारवाया, बांगलादेशींची घुसखोरी, अल्पसंख्याकांसाठी चाललेलं राजकारण, परप्रांतीयांचे लोंढे आणि त्यांच्या कारवाया, यासारखे विषय बाळासाहेबांना चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच जाणवले होते. हेच विषय परप्रांतातील नेत्यांनाही आता जाणवू लागले आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून असताना शीला दीक्षित अगदी जाहीरपणे काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या की, दिल्लीच्या नागरी समस्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे वाढत चालल्या आहेत. आजकाल राजकारण्यांवर थेट व्यंगचित्रं काढलेली फारशी दिसतच नाहीत. याचं कारण राजकारणी असंवेदनशील झाले आहेत. त्यांच्या त्या वाढत्या झुंडशाही आणि गटातटाच्या दहशतीमुळेदेखील व्यंगचित्रकार ते काढायला धजावत नाहीत. कोणत्या व्यंगचित्रामुळे कोण दुखावेल, हे सांगता येत नाही. हल्ली राजकीय नेतेही खूप झाले असून त्यांनी पोसलेले 'कार्यकर्ते'ही खूप असतात. एखाद्या वृत्तपत्राने आमच्या नेत्याचा उपहास करणारे व्यंगचित्र छापलं की, लगेच काढा मोर्चा, करा मोडतोड, काचा फोडा, आग लावा आणि जा पळून! नेतेच अशा असंस्कृत प्रकारांना उत्तेजन देतात आणि बाहेरून अशा घटनांचा ढोंगीपणाने निषेधही करतात. वृत्तपत्रांच्या, नियतकालिकांच्या मालकांना राजकारण्यांची नाराजी ओढवून घ्यायची नसते. अशा राजकारण्यांमार्फत मालकांनाही अनेक कामे करून घ्यायची असतात.

काही वृत्तपत्रांचे मालकच हल्ली राजकारणी असतात. व्रतस्थ पत्रकारिता संपुष्टात आली असून व्यापारवृत्तीच्या पत्रकारितेचे दिवस कधीच सुरू झाले आहेत. यामुळे संपादकच व्यंगचित्रकाराला म्हणतात, नको रे बाबा, डायरेक्ट व्यंगचित्र! तू इनडायरेक्ट टोमणाच मार काय मारायचा आहे तो...! पंचवीसेक वर्षांत काळ आणि वातावरण किती बदललं! समाज अधिक शिक्षित होण्याची, शिक्षणप्रसाराची प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच तो अनुदार, असमंजस, वैचारिकदृष्ट्या अनपढ होण्याची प्रक्रियाही दुसरीकडे सुरू आहे. बाळासाहेबांनी रेखाटलेली बोचरी व्यंगचित्रं बघून नेहरू, इंदिराजी, चव्हाण, पवार यांनी बाळासाहेबांना दम दिल्याचे समजले नाही. मात्र ती व्यंगचित्रं बघून त्यांनी बाळासाहेबांचं कौतुकच केलं होतं. आजच्यापेक्षा पंचवीस-तीस वर्षांपूर्वी अभिव्यक्तीस्वातंत्र्य अधिक होतं, असंच आजचं समाजचित्र सांगतं.

Bal Thackeray Birth Anniversary
Bal Thackeray Birth Anniversary(व्यंगचित्र 'फटकारे' या पुस्तकातून साभार)

'महाराष्ट्रभूषण' गौरव केला जावा

एक व्यंगचित्रकार, एक संघटक, एक राजकीय नेता म्हणून बाळासाहेबांना कोणते विषय आणि प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीनं जवळचे आणि जिव्हाळ्याचे वाटत असत, त्याची कल्पना त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रावरून येते. स्वतः बाळासाहेब यांनी फारसं लेखन केलेलं नाही, पण त्यांची व्यंगचित्रं हेच त्यांचे वैचारिक लेख आहेत. त्याद्वारेच ते आपली मतं, विचार, भूमिका मांडत होते. गेल्या अर्धशतकात महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जीवनावर तथाकथित पुरोगामी, डावे आणि समाजवादी यांचा वरचष्मा राहिलाय. वृत्तपत्रसृष्टीत आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर याच मंडळींचा वरचष्मा आहे. या मंडळींनी बाळासाहेबांची प्रतिमा सातत्याने संकुचित विचारांचा, प्रतिगामी, धर्मवादी व्यक्ती अशीच रंगविली. या साऱ्यांमुळे मला एका गोष्टीची फारच रुखरुख लागून राहिलीय, ती म्हणजे बाळासाहेबांची उत्तमोत्तम व्यंगचित्रं आणि सर्वसाधारण वाचक यांच्यात पडलेलं अंतर! हे अंतर पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या मत बनविणाऱ्या, ओपिनियन मेकर्स लोकांनी म्हणजे प्रसिद्धी माध्यमातील लोक, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, अभ्यासक, या मंडळींनी समाजातल्या शिक्षितवर्गावर आपल्या मतांचा, निकषांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव जो टाकायला हवा होता तो टाकला नाही. बाळासाहेबांची एक श्रेष्ठ दर्जाचा व्यंगचित्रकार अशी प्रतिमा तयार करण्यात रस दाखविला नाही.

श्रेष्ठ राजकीय व्यंगचित्रकार म्हणून तमिळनाडूतून महाराष्ट्रात आलेल्या आर. के. लक्ष्मण यांचं जेवढं कौतुक महाराष्ट्रानं केलं, त्याच्या पावपटही कौतुक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांच्या वाटेला आलेलं नाही. महाराष्ट्रातल्या बुद्धिजीवी वर्गानं बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकारितेचा यथोचित गौरव न करून करंटेपणाच दाखविला. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकारितेचा गौरव करण्याच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारने त्यांना मरणोत्तर 'महाराष्ट्रभूषण' पुरस्काराने सन्मानित केले, तर ते अधिक उचित ठरेल!

Bal Thackeray Birth Anniversary:
Bal Thackeray Birth Anniversary: भुईमुगाच्या शेंगा अन् 'दोराबजी'बिर्याणीवर बाळासाहेब ताव मारायचे!

व्यंगचित्रांची पुस्तके यावीत

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची पुस्तके निघायला हवीत. काही वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या हयातीतच नाटककार प्र. ल. मयेकर यांच्या पुढाकारानं 'कुंचला आणि पलीत' हे त्यांच्या व्यंगचित्रांचं छोटेखानी पुस्तक निघालं होतं. अलिकडेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या परिश्रमानं 'फटकारे' नावाचं पुस्तक निघालंय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाळासाहेबांनी म्हटलंय की, 'माळ्यावर टाकलेली आपली अनेक व्यंगचित्रे वाळवीनं खाऊन टाकली' हे वाचून खूप वाईट वाटलं. बाळासाहेबांची मार्मिक, बोचरी, बिनधास्त व्यंगचित्रे वाळवीनं खाऊन टाकल्याने महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालंय, हे शब्दांत सांगता येणार नाही.

प्रबोधनकारांची 'प्रबोधन' साप्ताहिकाचे अनेक अंक वाळवी लागल्याने नष्ट झाले होते, पण सांगलीतल्या काकडवाडीतील काकडे नावाच्या गृहस्थाकडे ते अंक सापडले अन् प्रबोधनकारांचा खजिना खुला झाला. तसंच बाळासाहेबांची व्यंगचित्रे वाचकांकडून मागवून पुस्तके काढायला हवीत. 'एका व्यंगचित्रकाराच्या नजरेतून स्वतंत्र भारताचा राजकीय इतिहास' लोकांसमोर येऊ शकेल. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमध्ये एकीकडे रांगडेपण आहे आणि लुसलुशीत, अकृत्रिम अशी नजाकतसुद्धा! काळ्या दगडावर पांढरी रेघ तसा बाळासाहेबांचा आकृतिबंध. कुठेही उधळमाधळ नाही. कारणाशिवाय एकाही रेषेची लुडबुड नाही. सगळं चित्र एकदम कसं रेखीव आणि आखीव! व्यंगचित्राची गेगलाईन चमकदार आणि टवटवीत. भाषा कधी कुरकुरीत, तर कधी करकरीत. कधी मोरपिसासारखी हळुवार, तर कधी चाकूच्या रेशीमपात्यासारखी...! विद्रोहाला कैकदा व्यंगाची मैत्री भावते असं म्हणतात, बाळासाहेबांबाबत हेच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची व्यंगचित्रं आणि त्याच्या कॅप्शन्सही याच कुळातलं. व्यंगाचा आधार घेऊन एका भेसूर, विद्रूप सत्याचं दर्शन घडवणारं! 'मी व्यंगचित्रकाराच्या हलकट नजरेतून सारं काही पाहतो,' असं बाळासाहेब अनेकदा म्हणत असत. खरं तर त्यांच्याकडे 'थ्री डायमेन्शनल' अशी नजर होती. आजूबाजूच्या भल्याबुऱ्या वास्तवातलं भेदक टिपणारी ही दृष्टी म्हणजे बाळासाहेबांचा 'तिसरा डोळा' !.-

(लेखातील व्यंगचित्रे 'फटकारे' या पुस्तकातून साभार)

Edited by: Mangesh Mahale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com