Modi Vs Thackeray Sarkarnama
देश

Modi Vs Thackeray: मला वाटते, ठाकरेंचे शब्द माझ्याऐवजी त्यांनाच जास्त लागू होतात...

Lok Sabha election 2024: 'सकाळ माध्यम समुहाचे' व्यवस्थापकीय संचालक आणि 'एपी ग्लोबाले'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीमधील वेचक भाग...

सरकारनामा ब्यूरो

Q: तुमचा एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून तुमच्यावर सातत्याने वैयक्तिक टीका होत आहे. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे?

A: माझ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेला मी कधीही प्रत्युत्तर देत नाही. देशभरातील माझे सर्व विरोधक अपशब्दांचा पुरेपूर वापर करत माझ्या परिवाराला, जातीला नावे ठेवत आहेत. सुरुवातीच्या काळातील माझ्या कौटुंबिक स्थितीचीही ते थट्टा करतात.

अर्थात, या प्रकारांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. देशातील जनतेची सेवा करण्यावर आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावरच मी माझे लक्ष केंद्रित केले आहे. स्वीकारलेल्या जबाबदारीशी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

तुम्ही थेट विचारलेल्या प्रश्‍नाबाबत बोलायचे, तर आम्ही एकत्र असतानाही हे लोक माझा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अवमान करत होते. युती धर्म पाळायचा म्हणून आणि अनेक दशकांचे संबंध होते म्हणून, मी त्यांच्या या वर्तणुकीकडे दुर्लक्ष करत होतो. मी आताही तेच करत आहे. मला वाटते, त्यांचे शब्द माझ्याऐवजी त्यांनाच जास्त लागू होतात.

हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे, की अनेक वर्षांपासून अशी वैयक्तिक टीका होत असली तरी केवळ जनतेलाच नाही तर त्यांचेच नेते, खासदार आणि आमदारांनाही हे कधीही पसंत पडलेले नाही. यामुळेच या लोकांनी त्यांच्या राजकीय प्रवासाचा मार्ग बदलला आणि ते आता बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या मार्गावर आहेत.

Q:आधीच्या प्रश्‍नाला अनुसरूनच हा प्रश्‍न आहे, सहकारी संस्थांनी राज्यभरात जी भूमिका बजावली आहे, त्यामुळे महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य ठरते. केंद्रात असलेल्या सरकारने प्रथमच यावर लक्ष केंद्रित केले आहे. या मागे नेमका कोणता विचार आहे?

A: गुजरातचा मुख्यमंत्री असल्यापासूनच मी सहकार क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी संस्थांना सर्वाधिक महत्त्व आहे, असा मला विश्‍वास आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याबाबत सहकार क्षेत्रामध्ये असलेल्या क्षमतेकडे आधीच्या केंद्र सरकारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.

त्यामुळेच, देशभरातील गावांमधील सहकारी संस्थांना पुन्हा एकदा बळ देण्यासाठी आणि ‘सहकारातून समृद्धी’ हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही स्वातंत्र्यानंतर प्रथमच सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली.

व्यवसायसुलभ वातावरण ही संकल्पना केवळ कंपन्यांसाठीच नसून तळागाळांत काम करणाऱ्या सहकारी संस्थांसाठीही आहे. त्यामुळेच आम्ही राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तयार करून त्यात राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण पातळीवरील सहकारी संस्थांची अचूक माहिती गोळा केली आणि ६५ हजार प्राथमिक सहकारी सोसायट्या, जिल्हा सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकांचे डिजिटायझेशन सुरू केले.

यामुळे सहकार क्षेत्रातील कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे. सहकारी संस्थेचा सदस्य असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक महिला भागधारकाला त्यांच्या सहकारी संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवता येणार आहे.

आम्ही अद्यापपर्यंत एकही सहकारी संस्था नसलेल्या दहा हजार गावांमध्ये आम्ही बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करणार आहोत. यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या व्यवसायातही वैविध्य आणण्याचा प्रयत्न असून पारंपरिक काम करणाऱ्या संस्था ते जनऔषधी केंद्र, एलपीजी डिलरशिप, पेट्रोलपंप, खतवितरण केंद्र आणि पाणी समिती यांचे संचालन करणारी संस्था असे त्यांचे रूपांतर केले जाणार आहे. यामुळे सहकारी संस्थांसमोरील उत्पन्न आणि रोजगारनिर्मितीच्या संधीही वाढतील.

भारतातील सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राने कायम महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटायजेशन, वैविध्यता आणि आदर्शवत कायदे निर्माण करून आम्ही सहकारी संस्थांचे लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत.

साखर सहकारी संस्थांविरोधात अनेक दशकांपासून प्रलंबित असणाऱ्या करप्रकरणांचा निपटारा केल्याने या संस्थांना ४६ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. सहकारी साखर कारखाने इथेनॉल खरेदीला प्राधान्य देत असून साखर सहकारी संस्थांना बळकटी आणण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

आपलीच खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे निवडक कुटुंबांकडून सहकारी संस्था चालविल्या जाण्याचीही आता शेतकरी आणि महिलांना काळजी करण्याची गरज नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे इंजिन बनण्यासाठी आम्ही सहकाराला बळकटी आणू. काही राजकीय नेत्यांसाठी संपत्ती आणि सत्ता मिळविण्याचे साधन बनण्याऐवजी सहकारी संस्थांना लोकांच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी देण्याची खरोखरची गरज निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT