Narendra Modi News: महाराष्ट्रातील नारी शक्तीला ‘लखपती दीदी’ बनवू!

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सहकारी संस्थांनाही मी ‘गॅरंटी’ देत आहे. त्यांना बहुउद्देशीय सहकारी संस्था बनण्यास, ज्यामध्ये मत्स्यपालन ते शेती आणि तळागाळापर्यंत उच्च मूल्य असलेल्या कृषी सेवा पुरविण्यासारखे विविध उद्योग हाताळता येतील, आम्ही पाठबळ देऊ.
Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama

'सकाळ माध्यम समुहाचे' व्यवस्थापकीय संचालक आणि 'एपी ग्लोबाले'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार (Abhijit Pawar) यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. विविध विषयांवर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मनमोकळा संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) झालेल्या या चर्चेतला वेचक भाग

Q: पुन्हा एकदा सत्तेत आल्यास महाराष्ट्रासाठी ‘मोदींची गॅरंटी’ काय असेल?

A: पायाभूत सुविधांचा आणखी प्रचंड विस्तार, आर्थिक आणि औद्योगिक विकास ही माझी महाराष्ट्रासाठी गॅरंटी असेल. ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जरकमेत दुपटीने वाढ करण्याचे आश्‍वासन आम्ही ‘संकल्पपत्रा’त दिले आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील युवा आणि महिला उद्योजकांना त्यांची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी होणार आहे.

आधुनिक कौशल्ये प्रदान करत आम्ही राज्यातील स्वयंसहाय्यता गटांना सशक्त करू आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊ आणि महाराष्ट्रातील नारी शक्तीला ‘लखपती दीदी’ बनवू. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनांमध्ये (पीएलआय) आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांमध्ये वाढ करणे, ही आमची गॅरंटी आहे. व्यवसायपूरक उपाययोजनांमुळे राज्यात अधिक गुंतवणूक आणि नवसंशोधन येऊन महाराष्ट्राच्या विकासाला आणखी वेग येईल.

सेमिकंडक्टर उत्पादन, हरितर्जा, इलेक्ट्रिक वाहन, एआय, इलेक्ट्रॉनिक्स आणि वित्त-तंत्रज्ञान सेवा निर्मिती क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता बनविण्यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात योजना आखल्या आहेत.

अर्थव्यवस्थेतील या नव्या आणि उभरत्या क्षेत्रांमध्ये देशाचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राला आम्ही पाठबळ देऊ. सहकार क्षेत्राला बळकटी आणण्यावर आणि अन्नदात्याचे राहणीमान सुधारण्यावर आम्ही जे लक्ष केंद्रित केले आहे, ते कायम राहील. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत, आपल्या शेतकऱ्यांना विनासायास पीकविमा मिळेल आणि अल्पकाळातच भरपाई मिळेल, याची आम्ही तजवीज करू.

महाराष्ट्रातील सहकारी संस्थांनाही मी ‘गॅरंटी’ देत आहे. त्यांना बहुउद्देशीय सहकारी संस्था बनण्यास, ज्यामध्ये मत्स्यपालन ते शेती आणि तळागाळापर्यंत उच्च मूल्य असलेल्या कृषी सेवा पुरविण्यासारखे विविध उद्योग हाताळता येतील, आम्ही पाठबळ देऊ.

महाराष्ट्रातील अत्यंत सजग असलेले छोटे व्यापारी आणि ‘एमएसएमई’ व्यावसायिकांनाही आमच्या ‘संकल्पपत्रा’त दिलेल्या ‘गॅरंटीं’चा प्रचंड फायदा होणार आहे. अनुपालन, छोट्या व्यावसायिकांसाठी विमा उत्पादनांची सुरुवात,परवडण्याजोग्या कर्जाची सहज उपलब्धता आणि ‘ओएनडीसी’ आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेची उपलब्धता या सर्वांची गॅरंटी आम्ही संकल्पपत्रात दिली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील ‘एमएसएमई’ व्यावसायिक आणि छोट्या उद्योजकांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास बळ मिळेल.

महाराष्ट्रातील पारंपरिक हस्तकला, वस्त्र आणि कला प्रकारांना जागतिक व्यासपीठांवर स्थान देण्याचीही मी हमी देतो. या कला शाश्‍वत रोजगार मिळवून देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान भूमीतील संस्कृतीचे जतन केले जाईल, गौरव केला जाईल आणि देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवली जाईल.

Q:महाराष्ट्रातील तुमच्या जागा यंदा कमी होतील, असा अनेक विरोधकांचा दावा आहे. तुम्हाला काय वाटते?

A:विरोधकांनी त्यांना स्वत:ला किती जागा मिळतील, याची चिंता करावी. सुमारे दशकभराच्या अकार्यक्षमतेबरोबरच आता, मतदारांशी संपर्क तुटल्याचाही धोका त्यांच्यासमोर आहे. ते विरोधक म्हणूनही अपयशी ठरले आहेत. त्यांचे स्वरूप आता कोणताही रचनात्मक कार्यक्रम नसलेल्या शहरी नक्षलवाद्यांच्या टोळ्यांसारखे झाले आहे.

त्यामुळे जर काही घटणार असेल, तरी विरोधकांची विश्‍वासार्हता घटणार आहे. आमच्या जागांच्या, विशेषत: महाराष्ट्रातल्या जागांच्या संख्येबाबत त्यांना वाटणाऱ्या चिंतेला कोणताही आधार नाही. २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकींमधील आणि इतर विधानसभा निवडणुकींमधील आमच्या विजयांमुळे हे स्पष्टच झाले आहे. जनतेने आमच्यावरील विश्‍वास कायम ठेवल्याने प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या यशाची कमान उंचच गेली आहे.

जनतेचे पाठबळ असल्याने केंद्रातही आमचे सरकार कायम आहे. भविष्यातील निवडणुकांमध्येही हेच चित्र कायम राहील आणि महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा अधिकाधिक संख्येने ‘एनडीए’च्या उमेदवारांना निवडून देतील, असा मला पूर्ण विश्‍वास आहे.

Narendra Modi News
PM Modi News: महाराष्ट्रातली आमची प्रगती उत्तमच; आता राज्याला आणखी पुढे नेण्याची माझी 'गॅरंटी'

Q:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्यामुळे महाराष्ट्रात ‘एनडीए’समोर आव्हान निर्माण झाले आहे, असे तुम्हाला वाटते का?

A:महाराष्ट्रातील जनता सुशासनाला आणि विकासाला मतदान करणार आहे. चांगली कामगिरी करून दाखविलेल्यांनाच महाराष्ट्रातील जनता मतदान करणार आहे. महाराष्ट्रातील जनता युवकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्यांनाच मतदान करणार आहे.

आणि हे सर्व करणारी ‘एनडीए’ आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष कधीही चांगले प्रशासन देऊ शकत नाहीत. त्यांची आघाडी अत्यंत विसंगत अशी आघाडी आहे. याच लोकांनी एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती, याच लोकांनी त्यांना धोका दिला होता आणि आता हेच लोक त्यांच्याबरोबर आघाडीत एकत्र आहेत.

जनता हे सर्व पाहत आहे. ही आघाडीकडून सर्व मूल्ये पायदळी कशी तुडवली जात आहेत, हे जनतेला दिसत आहे. लोकांनी ‘मविआ’च्या सत्ताकाळातील कुशासनही पाहिले आहे, विशेषत: सर्वोच्च नेतृत्वच लोकांसमोर येत नव्हते. त्यामुळे, ‘मविआ’पासून आम्हाला धोका आहे, असे मला वाटत नाही. काही जागांवर तर उमेदवारांबाबतही त्यांच्यात एकमत नाही. त्यासाठी भांडणे सुरू आहेत. ते एकमेकांनाच आव्हान देत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com