Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Sarkarnama
देश

घरावरील हल्ल्यानंतर केजरीवाल म्हणाले, ‘देश के लिए मेरी जान भी हाजिर...’

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी (BJP) बुधवारी (ता. ३० मार्च) त्यांच्या घरासमोर निदर्शने करत मोडतोड केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये राजकारण रंगले होते. घरावर झालेल्या हल्ल्याबाबत केजरीवाल यांनी आज (ता. ३१ मार्च) भाष्य केले आहे. (Arvind Kejriwal said about the attack on the house by BJP workers ...)

भाजप युवा मोर्चाच्या सुमारे १५०-२०० कार्यकर्त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळी निदर्शने सुरू केली होती. दुपारी एकच्या सुमारास काही आंदोलकांनी बॅरिकेड्‌स तोडून केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून ७० जणांना ताब्यात घेतले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘केजरीवाल महत्वाचा नाही. मी खूप लहान माणूस आहे. मी देशाचा एक सर्वसामान्य माणूस आहे, देशासाठी माझा जीवही द्यायला तयार आहे. पण, अशा गुंडागर्दीमुळे देशाची प्रगती होऊ शकणार नाही. आपल्याला देशाला पुढे न्यायचे असेल, २१ व्या शतकातील भारत बनवायचा असेल तर प्रेमाने काम केले तरच देश पुढे जाईल. गलिच्छ राजकारण आणि गुंडागिरीतच आपण देशाची ७५ वर्षे वाया घालावली आहेत. देशातील सत्ताधारी पक्ष राजधानीत अशी गुंडागर्दी करत असेल तर तरुणांमध्ये कोणता संदेश जाईल. ते विचार करतील की हेच बरोबर आहे, त्यातून वाईट संदेश जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणांमुळे देशाचा विकास होणार नाही.

या प्रकरणानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते निदर्शने करत होते. केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये आपचा विजय आणि भाजपचा पराभव यामुळे भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. भाजपच्या गुंडांना पोलिसांनी मुद्दाम मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थासमोर जाऊ दिले. इतकेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅरिकेट्सही तोडल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला होता. भाजप अरविंद केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही म्हणून ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आजची घटना ही मुख्यमंत्र्यांच्या हत्येसाठी भाजपची पूर्वनियोजित योजना असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT