kangna ranaut
kangna ranaut Sarkarnama
देश

कंगनासारख्या वाढत चाललेल्या मूर्खावळीला आवर घालायला हवा...

सरकारनामा ब्युरो

पुणे : "१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्येच मिळाले" या आपल्या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना रानौत आता वादात सापडली आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या एका परिषदेत बोलताना तिने हे वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यावर अनेक काँग्रेस नेत्यांसह अभिनेत्री स्वरा भास्कर, माजी सनदी अधिकारी सुर्यप्रताप सिंह यांनी टिका केली आहे. कंगनाच्या याच वक्तव्यावर अॅड. असीम सरोदे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अॅड.सरोदे म्हणाले, स्वातंत्र्य आपल्याला २०१४ साली मिळाले असे तिने म्हटले व अनेकांनी टाळ्या वाजवून तिला दाद दिली. अश्याच विकृत टाळ्यांचा आवाज महाराष्ट्राने एका खोटारड्या नाटकाच्या वेळी ऐकला आहे. असत्याला कवटाळून बसलेली व स्वातंत्र्य संग्रामात कवडीचे योगदान नसलेली ही प्रवृत्ती वाढतच आहे. त्यामुळे टाइम्स नाऊच्या कार्यक्रमात ज्यांनी टाळ्या वाजविल्या ते कंगना पेक्षा जास्त भयानक आहेत. स्वातंत्र्य 'भीक म्हणून मिळाले ' असे म्हणण्यातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात बलिदान केलेल्या लोकांनाच अपमान केला गेला आहे, या देशाचा अपमान केला आहे, असे सुद्धा आपल्याला वाटणार नसेल तर या देशाला कुणाचा धोका आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही सरोदे म्हणाले.

मूर्ख म्हणून कुणाकुणाला सोडून द्यायचे? ही मूर्खावळ वाढत चालली आहे. देशात महत्वाच्या पदांवर जाऊन विराजमान झालेली आहे. या देशाला पढत-मूर्खांचा धोका आहेच (तसेच अशिक्षित लोकांचा लोकशाहीला धोका आहे असे एका तडीपाराने सांगितले आहेच). मूर्खपणा प्रस्थापित होऊ नये यासाठी या देशाचे काही माईचे लाल नक्की काम उभे करतील आणि हे राष्ट्र पुन्हा बलशाली बनेल, असे सरोदे म्हणाले.

कंगनासाठी पंतप्रधान खरे सुपरस्टार -

कंगना या मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाली, मी ज्या कुटुंबातून आले, त्यात पंतप्रधानांना सुपरस्टार मानतात. त्यामुळे पंतप्रधानच माझ्या कुटुंबासाठी सुपरस्टार आहेत आणि नेहमीच राहतील. तसेच पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. यात कोणतीही शंका नाही. ते आपल्या देशासाठी आपल्याला मिळाले हे आपले भाग्यच आहे. मला वाटते की, त्यांनी आपल्या देशाला अशा ठिकाणी नेले आहे, जिथे उभे राहण्याचा आपल्याला खूप अभिमान आहे, असेही कंगना म्हणाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT