Haryana Congress Sarkarnama
देश

Congress Politics : खासदारांना लढवायचीय विधानसभेची निवडणूक; काँग्रेससाठी...इकडं आड तिकडं विहीर!

Rajanand More

Chandigarh : लोकसभेच्या निवडणुकीत अनेक आमदार तसेच राज्यसभेच्या सदस्यांना उतरवत काँग्रेसने बाजी मारली. पक्षाचे संख्याबळ 99 पर्यंत पोहचले. आता दोन राज्यांतील विधानसभेचे बिगूल वाजले असून पक्षातील काही खासदारांना आमदारकीची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे काँग्रेसची स्थिती इकडे आड, तिकडे विहीर, अशी झाली आहे.

हरियाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पाच जागा मिळाल्याने विधानसभेतही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी पक्षाच्या काही खासदारांनीही निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले हे नेते आहेत. त्यामध्ये कुमारी शैलजा आणि दीपेंदर सिंग हुडा यांची नावे चर्चेत आहेत.

काय म्हणाल्या कुमारी शैलजा?

कुमारी शैलजा यांनी माध्यमांशी बोलताना आपली इच्छा सांगितली. त्या म्हणाल्या, विधानसभेची निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे. पण पक्षनेतृत्वाचा अंतिम निर्णय असेल. हायकमांडचा आशिर्वाद ज्या नेत्याला मिळेल, ते मुख्यमंत्री होतील, असे मी एक सच्ची काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सांगतेय. अनेक स्पर्धक आहेत, पण अंतिम निर्णय हायकमांडचा असेल, असे खासदारांनी सांगितले.

काँग्रेसचे दुसरे खासदार दीपेंदर सिंह हुडा हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. राज्यात कुमारी शैलजा आणि हुडा या दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुप्त संघर्ष सुरू असल्याचे लपलेले नाही. त्यांनी एकमेकांचे नाव न घेता अनेकदा याबाबत उघडपणे भाष्य केले आहे.

काँग्रेसची कोंडी

हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक जिंकण्याची काँग्रेसला संधी असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात पाच जागा मिळाल्या आहेत. इतर राज्यांतही काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याने खासदारांचा आकडा 99 वर पोहचला.

आता हरियाणातील खासदारांना विधानसभेचे तिकीट दिल्यास लोकसभेतील ताकद कमी होईल. पुन्हा लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास तिथून निवडून येण्यासाठी पक्षाला मोठी कसरत करावी लागू शकते. विधानसभेतही निकाल काय लागणार, यावरही अनेक गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून पक्ष रिस्क घेणार का, हे लवकरच समजेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT