Congress, Bjp Sarkarnama
देश

Congress : काँग्रेसला समोसाही परवडेना; भाजपची संपत्ती डोळे दीपवणारी...

Rajanand More

Congress Vs Bjp : संयुक्त जनता दलाचे खासदार सुनील कुमार पिंटू यांनी काँग्रेसला जिव्हारी लागणारे वक्तव्य केले आहे. पक्षाकडे पैसे नसल्याने 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत समोसा नव्हता. केवळ चहा-बिस्कीटवर बैठक संपली, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यानंतर आता खरेच काँग्रेसकडे निधीची कमतरता आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती घेतल्यानंतर संपत्तीच्या बाबतीत काँग्रेस भाजपच्या जवळपासही नसल्याचे दिसून येते.

काँग्रेसने (Congress) नुकतीच ‘डोनेट फॉर देश’ (Donate for Desh) ही मोहीम सुरू केली आहे. देशवासीयांनी पक्षाला देणगी द्यावी, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. दोन दिवसांत जवळपास तीन कोटी रुपये जमा झाले आहेत. पण यावरून 'इंडिया' आघाडीतील (India Alliance) नेत्यांकडूनच काँग्रेसचा समाचार घेतला जात आहे. खासदार पिंटू यांनी याचाच संदर्भ देत समोसा, चहा-बिस्कीटावरून काँग्रेसला फटकारले आहे.  

दरम्यान, ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ या संस्थेकडून देशातील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडील संपत्तीची माहिती प्रसिद्ध केली जाते. या आकडेवारीनुसार, 2021-22 या वर्षात आठ राष्ट्रीय पक्षांकडील एकूण संपत्ती 8 हजार 829 कोटी होती. त्यामध्ये सर्वात श्रीमंत पक्ष अर्थात भाजप आहे. या पक्षाच्या जवळपास कोणताही पक्ष नाही. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसची संपत्ती जेमतेम ८00 कोटींच्या जवळपास होती. तर तिसऱ्या क्रमांकावर बसपा असून या पक्षाची संपत्ती 690 कोटी होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या संपत्तीत मोठी वाढ

भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर संपत्तीत अतिशय वेगाने वाढ झाल्याचे दिसते. 2004-05 या वर्षात भाजपची संपत्ती केवळ 123 कोटींच्या जवळपास होती. 2015-16 मध्ये हा आकडा 893 कोटींवर पोहचला. पुढील पाच-सहा वर्षांतच पक्षाकडील संपत्ती सहा हजार कोटींच्या पुढे गेली. त्यातुलनेत काँग्रेसच्या संपत्तीतील वाढ कासवगतीने झाली. 

काँग्रेसच्या संपत्तीला ग्रहण

2004-05 मध्ये पक्षाची संपत्ती 167 कोटी म्हणजे भाजपपेक्षा जास्त होती. पण 2015-16 पर्यंत काँग्रेसला मागे टाकले. काँग्रेसची संपत्ती 758 कोटींपर्यंत वाढली. तर मागील पाच-सहा वर्षांत त्यात 50 कोटींचीही भर पडली नाही. 2021-22 मध्ये काँग्रेसच्या नावावरच सर्वाधिक देणी होती. जवळपास 42 कोटींची देणी असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर भाजपच्या नावापुढे केवळ 5.17 कोटींची देणी होती.

काँग्रेसकडून लोकसभेची तयारी

काँग्रेसने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 'इंडिया' आघाडीमध्ये सध्यातरी काँग्रेस समन्वयाची भूमिका पार पाडत आहे. आघाडीतील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशभरात निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. तर इतर पक्षांवर त्या-त्या राज्यांतील जबाबदारी असेल. त्यामुळे खर्चाचा सर्वाधिक भार अर्थातच काँग्रेसच्या खांद्यावर असणार आहे. त्यासाठी निधी जमवण्यात पक्षाला किती यश मिळेल, हे लवकरच समजेल.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT