Viral 'Donald Trump' Buffalo: ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईद जवळ आली की बाजारात बकरे, मेंढ्या, उंट यांची चर्चा रंगते… पण यंदा बांगलादेशात सगळी लाइमलाइट दोन रेड्यांनीच हिसकावून घेतली आहे. कारण हे काही साधेसुधे रेडे नाहीत; त्यांची नावंच अशी आहेत की लोक सेल्फी काढायला रांगा लावत आहेत. एका रेड्याचं नाव आहे “डोनाल्ड ट्रम्प”, तर दुसऱ्याचं “बेंजामिन नेतन्याहू”!
ढाक्याजवळील एका फार्मवर असलेला जवळपास 700 किलो वजनाचा पांढरट रंगाचा रेडा सध्या सोशल मीडियाचा स्टार बनला आहे. त्याच्या डोक्यावरचे सोनेरी केस पाहून लोकांना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) आठवत आहेत. रेड्याचा हेअरस्टाईल इतका ‘ट्रम्पमय’ दिसतो की फार्मवर येणारे लोक आधी फोटो काढतात आणि मग रेड्याकडे बघून हसत राहतात.
रेड्याच्या मालकाने सांगितलं की, त्याच्या भावाने गंमत म्हणून त्याचं नाव “डोनाल्ड ट्रम्प” ठेवलं. पण लोकांनी ते इतकं डोक्यावर घेतलं की आता हा रेडा परिसरातील सेलिब्रिटी झाला आहे. गंमत म्हणजे, चेहरा ट्रम्पसारखा असला तरी स्वभाव मात्र अगदी शांत आणि गोड असल्याचं त्याला भेटलेल्या व्यक्ती सांगत आहेत. सोशल मीडियावर त्यावर नेटकऱ्यांची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे “बेंजामिन नेतन्याहू” नावाचा दुसरा रेडा मात्र पूर्ण उलट स्वभावाचा आहे. तब्बल 750 किलो वजनाचा हा रेडा कायम रागात असल्यासारखा वागतो. फार्मवरील कर्मचारी सांगतात की, हा अचानक धावतो, फुंफकारतो आणि कुणालाही घाबरवत फिरतो. त्यामुळेच त्याचं नाव इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या नावावर ठेवल्याची चर्चा आहे.
या दोन्ही रेड्यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की लोक आता बकरी ईदच्या खरेदीपेक्षा “ट्रम्प” आणि “नेतन्याहू” सोबत सेल्फी घेण्यात जास्त रस दाखवत आहेत. सोशल मीडियावर तर मीम्सचा पाऊस सुरू असून, “जागतिक राजकारण आता गोठ्यात पोहोचलं” अशा कमेंट्स व्हायरल होत आहेत.