Public sector banks 3-day strike : देशभरातील सरकारी कार्यालये, बँका रविवारी बंद असतात. मात्र, येत्या रविवारी २७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाने प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
बँक कर्मचाऱ्यांकडून २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावित संपाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बँकिंग सेवांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्याचा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळए सरकारने येत्या रविवारी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थ मंत्रालयाने बुधवारी प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचा प्रस्तावित संप २६ आणि २७ सप्टेंबरच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांनंतर आहे. या दोन दिवसांच्या सुट्ट्या आणि संपाचे तीन दिवस असे सलग पाच दिवस ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सुट्या आणि संपामुळे ग्राहकांच्या बँकेशी संबंधित अत्यावश्यक गरजांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज २७ सप्टेंबर रोजी नियमितपणे सुरू राहील, असे अर्थ मंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले आहे. संप सुरू होण्यापूर्वी ग्राहकांना बँकेशी संबंधित महत्वाची कामे करता यावीत, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक भागात शुक्रवारपासूनच बँकांचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे सलग सहा दिवस बँका बंद राहण्याची भीती आहे. असे झाल्यास अनेक ग्राहकांना अत्यावश्यक कामे करता येणार नाही. रविवारी एक दिवस बँका सुरू राहिल्या तरी ग्राहकांना सर्व सेवा उपलब्ध होतील. दरम्यान, सरकारने बँक कर्मचारी संघटनांना प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.