Bharat Bandh File Photo
देश

सोमवारी भारत बंद; दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात

भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादीसह देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सोमवारी (ता. 27) संयुक्त किसान मोर्चाकडून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये चाळीस शेतकरी संघटनांचा समावेश आहे. भारत बंदला बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. नागरिकांनीही या मोर्चात उत्स्फुर्त सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांकडून करण्यात आलं आहे.

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर मागील दहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनाला सोमवारी 10 महिने पूर्ण होत आहेत. पण त्यानंतर केंद्र सरकारकडून कायद्यांबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याविरोधात सोमवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.

भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादीसह देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, राजकीय नेत्यांसोबत सोमवारी व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय शेतकरी संघनांनी घेतला आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अन्य काही संघनांनींही बंदचे समर्थन केलं आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशनने पाठिंबा जाहीर केला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना कोणत्याही स्थितीत दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी सहा ते दुपारी चार वाजेपर्यंत भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शिक्षण संस्था, दुकानें, उद्योग आणि व्यावसायिक आस्थापना बंद करण्याचे आवाहन मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

बंदमधून आपत्कालीन, अत्यावश्यक सुविधा, दुकाने वगळण्यात आली आहेत. बंददरम्यान लोकांना त्यांच्या मर्जीने बंद ठेवण्याचे आवाहन केले जाईल. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही. या आंदोलनात तोडफोड किंवा कोणत्याही हिंसेला स्थान नसेल. हा बंद शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात आहे, लोकांच्या विरोधात नाही. त्यामुळं लोकांना त्रास होईल, अशी कृती केली जाणार नाही, असंही मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT