Bhopal News, 08 Nov : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आमदार विश्रामगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदाराच्या नावावर आरक्षित असलेल्या खोलीत एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार अचानक खोलीवर पोहोचल्याने घाबरलेल्या दोघांनीही तेथून पळ काढला. या प्रकरणी आमदारांनी थेट विधानसभा सचिवालयाकडे तक्रार करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
महिदपूरचे काँग्रेस आमदार दिनेश जैन बोस यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून परतल्यानंतर दुपारी २ च्या सुमारास ते भोपाळ येथील आमदार विश्रामगृहातील ब्लॉक क्रमांक ३ मध्ये पोहोचले. येथे त्यांच्या नावावर खोली क्रमांक १४ आणि १५ आरक्षित आहेत.
त्यांनी केअरटेकरकडे खोली क्रमांक १५ ची चावी मागितली, मात्र ती उपलब्ध नसल्याने त्यांना खोली क्रमांक १४ ची चावी देण्यात आली. आमदार बोस हे खोली क्रमांक १४ मध्ये पोहोचले असता, शेजारील खोली क्रमांक १५ मध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आमदारांना पाहताच त्या दोघांनीही तेथून काढता पाय घेतला.
केअरटेकरवर निष्काळजीपणाचा आरोप
आपल्या नावावर आरक्षित असलेल्या खोलीची चावी रिसेप्शन काउंटरवर असते. आमदार किंवा त्यांच्या खासगी सहाय्यकाची (PA) कोणतीही परवानगी न घेता केअरटेकरने अनोळखी व्यक्तींना खोलीत प्रवेश कसा दिला, असा थेट सवाल आमदार दिनेश जैन बोस यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभा सचिवालयाकडे तक्रार
या गंभीर प्रकारानंतर आमदारांनी विधानसभा सचिवालयाच्या प्रमुख सचिवांना पत्र लिहून सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सचिवालयाने या तक्रारीची दखल घेत पुढील चौकशी आणि कारवाईसाठी हे प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) वर्ग केले आहे.