रेशनकार्डधारकांसाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्राने राज्य सरकारांना पत्र पाठवून धान्य वितरणाच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या या सूचनेनुसार, राज्यांनी आता जून 2026 पर्यंत लागणारे तीन महिन्यांचे गहू आणि तांदूळ आगाऊ पद्धतीने केंद्राकडून उचलून घ्यायचे आहेत. हे धान्य केंद्रीय साठ्यातून घेऊन ते पात्र लाभार्थ्यांमध्ये वाटप करायचे आहे. सरकारी गोदामांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात धान्य साठा उपलब्ध असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात केंद्राने सर्व राज्यांच्या अन्न विभागाच्या सचिवांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात साठवणूक आणि वाहतूक यासंबंधी येणाऱ्या अडचणींचा विचार करून आगाऊ धान्य उचलण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांनी जून 2026 पर्यंतचा धान्य साठा आधीच उचलून तो रेशनधारकांना वितरित करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत राबवली जात आहे.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य उपलब्ध आहे. गुरुवारपर्यंत एफसीआयकडे सुमारे 37.2 दशलक्ष टन तांदूळ आणि 23.5 दशलक्ष टन गहू साठवून ठेवण्यात आला आहे. हा साठा निश्चित केलेल्या आवश्यक पातळीपेक्षा सुमारे 185 टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय लवकरच नव्या हंगामातील गव्हाची खरेदीही सुरू होणार आहे. त्यामुळे सध्याचा साठा कमी करून गोदामांमध्ये नवीन धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यांना आगाऊ धान्य उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयाचा देशभरातील 80 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. धान्याचे नियोजनबद्ध वितरण झाल्यामुळे रेशन दुकानदारांनाही पुरेसा साठा उपलब्ध राहील आणि लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळण्यास मदत होईल. तसेच गोदामांमध्ये जागा मोकळी झाल्यामुळे नवीन धान्य साठवणेही सोपे होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.