Abhijit Tiwari
Abhijit Tiwari Sarkarnama
देश

पेट्रोल महागलं अन् मग चक्क घोड्यावरूनच सुरू झाली वीजबिल वसुली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 14 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढीमुळे खर्च कमी करण्यासाठी आता थेट घोड्यावरून वीजबिल वसुली करण्यात येत आहे. बिहारच्या वीज विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ही शक्कल लढवली आहे. (Petrol Diesel price hike News)

शिवहर जिल्ह्यातील जाफरपूर गावातील वीज विभागाचे कर्मचारी अभिजित तिवारी यांनी वीजबिल वसुलीसाठी चक्क घोड्यावर मांड ठोकली आहे. घोड्यावर बसून वीजबिल वसुली करतानाचे त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अभिजित तिवारींचे वडील शिवशंकर तिवारी यांना घोडे पाळण्याचा छंद आहे. त्यामुळे त्यांना घोड्यावर बसून ही वसुली करणे शक्य झाले आहे.

या अनोख्या प्रयोगाबद्दल तिवारी म्हणाले की, पेट्रोलचे दर रोज नवा उच्चांक गाठत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे दुचाकी चालवणे आता परवडत नाही. घोड्याला रोज लागणाऱ्या खाद्याच्या तुलनेत पेट्रोलचा खर्च दुपटीने महाग आहे. वीजबिलाच्या वसुलीसाठी मला बरेच फिरावे लागते. त्यात दररोज २५० रुपये पेट्रोलसाठी खर्च येतो. घरी घोडा असल्याने मला घोडेस्वारी करता येते. म्हणून महाग पेट्रोल गाडीत भरण्यापेक्षा वसुलीसाठी घोड्यावर जाणे मी पसंत करतो.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 14 दिवसांत 12 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 8.40 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.81 रुपये झाला असून, डिझेलचा दर 95.07 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 118.83 रुपये आणि डिझेलचा दर 103.67 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी आधीच दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT