Nitish Kumar, Lalu Prasad Yadav Sarkarnama
देश

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात भूकंप? नीतिश कुमारांच्या पक्षाचे अध्यक्षच लालूंच्या संपर्कात

Rajanand More

Bihar News : बिहारच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या संयुक्त जनता दल या पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांची उचलबांगडी केली जाऊ शकते. लल्लन सिंह यांची राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी जवळीक वाढत चालल्याचे बोलले जात आहे.

'जेडीयू'च्या (JDU) राष्ट्रीय कार्यकारिणीची २९ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लल्लन सिंह (Lalan Singh) यांच्यावरील अध्यक्षपदाची जबाबदारी काढली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लल्लन सिंह हे आणखी काही काळ अध्यक्ष राहिल्यास लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आधी पक्षात फुट पडू शकते, अशी भीतीही नीतिश कुमार (Nitish Kumar) यांना आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नीतिश कुमार स्वत:कडेच अध्यक्षपद ठेवतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षातील त्यांच्या निकटवर्तीयांकडूनही तशी मागणी होत आहे. पक्षातील मतभेद थांबविण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते. लल्लन सिंह यांच्याऐवजी दुसरा कोणताही नेता त्यातून मार्ग काढू शकत नाही, अशी भावना आता पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लल्लन सिंह यांच्याकडून पक्षाची बांधणी योग्यप्रकारे केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रामुख्याने त्यांची आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबतच जवळीक, यामुळे नीतिश कुमार त्यांच्यावर नाराज आहेत. लल्लन सिंह यांना लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. ते आरजेडीच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात, अशीही शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी जेडीयूचे आरजेडीमध्ये विलीनीकरण होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी दोन्ही एकत्र होतील, असे ते म्हणाले आहेत. तेजस्वी यादव यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. केवळ प्रसिध्दीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत, यादव यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT