Bihar News: बिहारमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल युतीनं मोठा विजय मिळवला. या विजयानंतर नितीश कुमारांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी विक्रमी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण काही महिन्यांपूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी तडकाफडकी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिथे भाजपचा मुख्यमंत्री बसवला. या मोठ्या घडामोडीनंतर नितीश कुमार यांना आरजेडीनंतर आता काँग्रेसकडूनही महाआघाडी येण्याची ऑफर देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या अखिलेश प्रसाद सिंह यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. केंद्रातलं भाजप प्रणित एनडीए सरकार नितीश कुमारांच्या पाठिंब्यावर सत्तेत विराजमान आहे. बिहारसह देशाच्या राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांच्या राजकारणाचा पॅटर्न पाहिला तर ते कधी पलटी मारतील हे कुणालाही सांगता येणे कठीण आहे. त्याचदरम्यान, ही मोठी राजकीय घडामोड समोर आल्यानं बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बिहार काँग्रेसचे नेते आणि खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी शुक्रवारी (ता.18 सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महाआघाडीत येण्याचं जाहीर आवाहनही केलं आहे.
काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले,एनडीएमध्ये काहीही सुरळीत नाही. नितीश कुमार यांची नेहमीच समाजवादी विचारसरणी राहिली आहे. भाजप ज्या पद्धतीने आपला अजेंडा ठरवत आहे, त्यामध्ये त्यांना अस्वस्थ वाटणे स्वाभाविक आहे. कोणत्या परिस्थितीत ते तिकडे गेले,हे माहीत नाही. मात्र, त्यांचे खरे स्थान समाजवादातच आहे. तिथे जसजशी अस्वस्थता वाढत जाईल, तसतसे त्यांना तिथून बाहेर पडावे लागणार असल्याचंही सिंह यांनी सांगितले.
काँग्रेस खासदारांनी यावेळी नितीश कुमार यांच्याबाबत दावा केला की, त्यांनी निश्चितपणे महाआघाडीसोबत यायला हवे.त्यांची नैसर्गिक आघाडी तर इकडेच आहे. तसेच फरक्का जल करारावरून जेडीयूकडून भाजपवर दबाव आणला जात असल्याची टीकाही काँग्रेस नेते सिंह यांनी केली आहे.
तसेच समान नागरी कायदा (UCC) मुद्द्यावर जेडीयू आणि भाजपमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे एनडीएमध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे का? अशा विविध प्रश्नांवर अखिलेश प्रसाद सिंह यांनी आपलं रोखठोक भाष्य केलं आहे.
काँग्रेसपूर्वी आरजेडीचे भाई वीरेंद्र यांनीही जेडीयूला सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली होती. आता काँग्रेसकडूनही नितीश कुमार यांना महाआघाडीत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र,याबाबत जेडीयूला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. अशाप्रकारच्या विरोधकांच्या एकापाठोपाठ एक ऑफर्समुळे भाजपची चिंता नक्कीच वाढली असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.