PM Modi apology demand by Rahul Gandhi: नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी ही एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलंय की, "देशातील विद्यार्थ्यांविरोधात संपूर्ण व्यवस्था उभी राहिली आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार झाला. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांवर कोणताही एफआयआर होणार नाही आणि त्यांची सुटका केली जाईल, असं आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचं काय झालं?"
याच पोस्टमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा आरोपही केला. राहुल गांधी म्हणाले, "दिल्लीत विद्यार्थ्यांवर पेललेट गनचा वापर झाला, तर बिहारमध्ये AK-47 वापरण्यात आली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि दिल्ली अशा विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने दडपशाहीचा मार्ग स्वीकारला आहे."
शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले, "सरकारमध्ये प्रामाणिकपणे शैक्षणिक सुधारणा करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. पंतप्रधान मोदी तुम्ही देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा."
पेपरफुटी प्रकरणामुळे गेल्या काही आठवड्यांपासून देशातील विविध भागांत विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसह दोषींवर कठोर कारवाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागण्या सातत्याने केल्या जात होत्या.
आंदोलनाचा दबाव वाढत गेल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. या घडामोडीनंतर राजकीय वातावरण आणखी तापले असून हा मुद्दा संसदेतही गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या प्रकरणावरून जोरदार राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.