Waqf Act News : वक्फ (सुधारित) कायदा लागू झाल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सलग तीन दिवसांपासून त्यावरून सत्ताधारी विरुध्द विरोधक असा संघर्ष सुरू आहे. बुधवारी तर भाजप आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे विधानसभा आखाडा बनल्याचे चित्र दिसत होते.
सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सकडून वक्फ कायद्यावर चर्चेची मागणी केली जात आहे. भाजपकडून त्याला विरोध केला जात असून चर्चा होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या आमदारांनी घेतली आहे. कायद्यावरील चर्चेच्या मुद्द्यावरून विधानसभेत जोरदार हंगामा झाल्यानंतर कामकाज तीन तासांसाठी तहकूब करावे लागले.
यादरम्यान विधानसभा सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच भाजप आणि आपचे आमदार आमनेसामने आले. या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. विधानसभेत हिंदूंबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप भाजप आमदारांनी आपच्या आमदारावर केला. त्याचप्रमाणे पीडीपीच्या नेत्यांनीही आपच्या आमदारांने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याचे म्हटले.
भाजपचे आमदार विक्रम रंधावा आणि आपचे आमदार मेहराज मलिक यांच्यामध्ये सुरूवातीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. यावेळी दोन्ही आमदारांचे कार्यकर्तेही आवारात उपस्थित असल्याने मोठा गोंधळ उडाला. भाजपच्या लोकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा मलिक यांनी मीडियाशी बोलताना केला.
रंधावा यांनीही मलिकांवर गंभीर आरोप केले. मलिक यांनी हिंदूंना शिवीगाळ गेली. हिंदू टिळा लावून दारू पितात, चोरी करतात, असे आपचे आमदार म्हणाल्याचा दावा रंधावा यांनी केला. यावेळी रंधावा प्रचंड आक्रमक झाले होते. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
विधानसभेच्या सभागृहातही मार्शल्सला हस्तक्षेप करावा लागला. भाजप आणि सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. कॉन्फरन्सच्या आमदारांकडून वक्फविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर भाजपच्या आमदारांनी वक्फचे समर्थन केले. त्यामुळे सभागृहातच तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मार्शल्सला पाचारण करावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.