BJP Flags
BJP Flags  Sarkarnama
देश

भाजपचा दे धक्का! विधान परिषदेतही विरोधकांचा सुफडा साफ

सरकारनामा ब्युरो

लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत (UP Election 2022) विरोधकांना धूळ चारणाऱ्या भाजपने (BJP) विधान परिषदेच्या निवडणुकीतही विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. विधान परिषदेच्या (MLC) एकूण 36 जागांपैकी 33 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर तीन जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला (SP) या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास घडवत पुन्हा सत्ता काबीज केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाने मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे पक्षाला शंभरचा आकडा पार करता आला. त्यानंतर काही दिवसांतच विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी झाली.

विधान परिषदेच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाकडून भाजपला आव्हान दिलं जाईल, असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात होते. पण प्रत्यक्ष निकालामध्ये वेगळंच चित्र दिसून आलं आहे. एकूण 36 पैकी एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आलेला नाही. भाजपने 33 जागा जिंकत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. अनेक जागांवर सपाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.

भाजपच्या हातून निसटलेल्या तीन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. त्यामध्ये वाराणसी, आझामगड आणि प्रतापगड या जागांचा समावेश आहे. कुशीनगर आणि देवरिया मतदारसंघातून सपाच्या तिकीटावर उभे राहिलेले डॉ. कफील खान यांचाही मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे. गोरखपूर रुग्णालयातील ऑक्सीनज प्रकरणात खान यांच्यावर योगी सरकारने ठपका ठेवला होता. त्यांनाच सपाने उमेदवारी दिली होती.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा (Sonia Gandhi) लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत भाजपने विधानसभेपाठापोठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही विजय मिळवला आहे. भाजपचे दिनेश प्रताप सिंह विजयी झाले आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनिल कुमार साजन लखनऊ मतदारसंघात पराभूत झाले आहेत. त्यामुळे अखिलेश यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT