BJP News: भाजप हा नेहमीच आजच्यासोबतच पुढच्या काही वर्षांचा विचार करुन राजकीय,संघटनात्मक रणनीती आखणारा पक्ष राहिला आहे. तसेच संकटात सुद्धा संधी शोधणारा पक्ष अशीच भाजपची ओळखही मानली जाते. याचा प्रत्यय अनेकदा राजकीय पक्षांनी घेतलेला आहे. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या जोडगोळीच्या अनेक राजकीय खेळ्यांनी विरोधकांना अनेकदा जोरदार धक्का देत त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्याचदिशेनं भाजप परत एकदा पावले टाकली आहेत. विरोधकांच्या राजकीय कमबॅकसाठी कमालीचा 'बूस्टर डोस' ठरलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आगामी काळात त्यांच्यावरच बूमरँग करण्यासाठी मोदी-शाह मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नीटचा पेपर फुटल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याच सरकारविरोधातील लाटेला सोबत घेत कॉक्रोच जनता पार्टीनं जंतरमंतरवर ऐतिहासिक आंदोलन केलं. या आंदोलनामुळे सरकारलाही अखेर एक पाऊल मागे घ्यावं लागलं. कधी नव्हे ते 12 वर्षांच्या तीन टर्ममध्ये पहिल्यांदाच एखाद्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की मोदी सरकारवर आली.
ऐनपावसाळी अधिवेशनातच धर्मेंद्र प्रधानांसारख्या मातब्बर नेता आणि मंत्र्याचा घ्यावा लागलेला राजीनाम्या घाव भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. तसेच प्रधानांमुळे भाजप पहिल्यांदाच अधिवेशनकाळात बरंचसं बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. प्रधानांच्या राजीनाम्यामुळे सीजेपी किंवा विरोधकांना बाराहत्तीचं बळ मिळाल्याचं काँग्रेस, समाजवादी पार्टी वा इंडिया आघाडीत प्रचंड उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.
मात्र, मोदी-शाह यांच्यासारखे मुरब्बी नेते संकटातही संधी शोधणार नाही असंकसं होईल. प्रधानांच्या राजीनाम्याचा भाजपनं भविष्यात पक्षाला कसा आणि कुठे फायदा होईल यासाठी जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही धर्मेंद्र प्रधान यांचं संसदेत भाजपसह सत्ताधारी एनडीए सरकारमधील खासदारांनी जोरदार स्वागत केलं होतं.
भाजप हा पक्ष नेहमीच बेरकी आणि बेरजेचं राजकारण करत आलेला पक्ष आहे. भाजप हा पक्षसंघटना मजबूत करण्यासोबतच इतर पक्षांतील मातब्बर नेत्यांच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून असतो. तसेच संधी मिळताच त्या पक्षांना आणून आपली पाळमुळं आणखी घट्ट करतो. पण याचसोबत भाजप हा जाती-जातींची ताकद ओळखून आपलं राजकीय रणनीती आखताना दिसून येतो.
भाजप हा पक्ष कायमच निवडणुकांच्या अॅक्शन मोडवर असतो. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र,पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारखी मोठी राज्य जिंकलेल्या भाजपचं पुढचं मिशन उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत. या राज्यातील निवडणुकीवर 2029 च्या लोकसभेची अनेक गणितं अवलंबून असणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशची निवडणुकीकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.
मोदी-शाह यांचे अत्यंत जवळचे आणि तितकेच विश्वासू नेते म्हणून धर्मेद्र प्रधानांकडे पाहिले जाते. त्यांचं भाजपच्या पक्षसंघटन मजबूत करण्यातही मोठं योगदान राहिलं आहे. मात्र, प्रधान हे ओबीसींमधील कुर्मी समाजातून पुढे आलेले नेते आहे. हा समाज उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वसलेला असून ओबीसींमधील प्रमुख जात म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. याच जातीवर उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचं बरंचसं राजकारण अवलंबून आहे.
महत्वाची बाब म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हाच कुर्मी समाज अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीसोबत गेल्यानं भाजपचं मोठं नुकसान झालं होतं. याउलट सपाला कु्र्मी समाजाचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं होतं. कारण 2019 च्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या पाच जागा जिंकलेल्या सपानं 2024 च्या निवडणुकीत तब्बल 37 जागा जोरदार मुसंडी मारत भाजपच्या 'मिशन 400 प्लस'ला जोरदार धक्का दिला होता.यापूर्वी 2014 ते 2022 पर्यंत कुर्मी समाज भाजपसोबत राहिल्यानं भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मोठं यश मिळालं होतं
उत्तर प्रदेशच्या राजकारणात कुर्मी समाजाची मतदारसंख्या सुमारे 7 ते 8 टक्के इतकी आहे. कुर्मी समाज आगामी विधानसभा निवडणुकीत किंगमेकर किंवा निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. हीच बाब हेरून भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याआडून उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 'अंडर करंट'ची चाचपणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
विरोधकांसाठी बूस्टर डोस ठरलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्यांच्यावरच बूमरँग करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्याचमुळे प्रधानांच्या राजीनाम्याला सामाजिक व भावनिक मु्द्दा करत भाजप उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सपाविरोधात राजकीय वातावरण तयार करू शकतो. हीच बाब हेरून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत प्रदेशाध्यक्षही कुर्मी समाजाचाच निवडला आहे. यावरुनच भाजपसाठी कुर्मी समाज अत्यंत महत्वाचं असल्याचं अधोरेखित होतं.
कुर्मी समाज उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल ते बुंदेलखंड आणि अवध पासून रुहेलखंड या भागात मोठ्या प्रमाणात विस्तारलेला दिसून येतो. याच भागातून सपाला लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. त्याचमुळे 2024 ला सपासोबत गेलेला कुर्मी समाज आगामी विधानसभा आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे पुन्हा एकदा खेचून आणण्याच्या प्रयत्नात आहे.
भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तर प्रदेशमध्ये काम केलं आहे. त्यामुळे भाजप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा फायदा उचलण्याच्या तयारीत असून त्यांनाच आगामी विधानसभा,लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. राजीनाम्यानंतरची भाजपकडून करण्यात येत असलेली सकारात्मक वातावरण निर्मिती हा मोदी-शाह या जोडीच्या राजकीय रणनीतीचाच एक भाग असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.