BJP News : पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पॉन्डिचेरी या 5 राज्याचे निकाल जाहीर होत आहेत. यात पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला सत्ता मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी केरळमध्ये काँग्रेसला गुड न्यूज मिळाली आहे. तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसचे केरळच्या सत्तेत कमबॅक होत आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या पदरी केरळमध्ये मात्र निराशा पडली आहे. केवळ 2 जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे.
भाजपने केरळमध्ये प्रचंड ताकद लावली होती. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली होती. त्यांच्याकडेच प्रचार आणि निवडणुकीची मुख्य धुरा देण्यात आली होती. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळ, विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार-खासदारांची आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची फौज प्रचारासाठी केरळच्या मैदानात उतरली होती.
महाराष्ट्रातूनही तब्बल 87 जणांची टीम तावडे यांच्या मदतीसाठी दिली होती. यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार मनोज कोटक, प्रवीण दटके, रणजित पाटील, प्रताप अडसड, राम सातपुते, अनिल सोले यांच्यासह इतर काही नेते केरळच्या दौऱ्यावर गेले होते. हे सर्व नेते केरळच्या पारंपारिक वेशात लुंगी आणि शर्ट घालून प्रचार करत होते.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे कोट्टेरक्करा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय प्रवीण दटके यांच्याकडे तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील कझकूटम, डॉ. परिणय फुके यांच्याकडे ‘पुनजर’, माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे नेडूमंगाड, अनिल सोले यांच्याकडे ‘नेयाट्टीनकारा, गिरीश व्यास यांच्याकडे ‘नेमम’ या मतदारसंघातील प्रचाराची धुरा सोपवण्यात आली होती.
विदर्भातील आर्वीचे आमदार सुमीत वानखेडे, गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे, वरोराचे आमदार करण देवतळे, चिखलीच्या श्वेता महाले, अकोल्याचे रणजित पाटील आणि धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड हेही केरळमध्ये प्रचारासाठी फिरले होते. पण ही सगळी फौज मैदानात उतरवूनही भाजपच्या हाती केवळ 2 जागा लागल्या आहेत.
भाजपची केरळमधील कामगिरी :
भाजपने 2016 च्या विधानसभा निवडणुकीत एक जागा जिंकली होती. 2021 च्या निवडणुकीत मात्र भाजपला खातेही उघडता आले नव्हते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्रिशुर लोकसभा मतदारसंघातून सुरेश गोपी निवडून आले. ते भाजपचे केरळमधील पहिले खासदार ठरले. सध्या ते केंद्रीय मंत्री आहेत. तिरुअनंतपूरमध्येही भाजपचा महापौर झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.