Shatrughan Sinha and Agnimitra Paul
Shatrughan Sinha and Agnimitra Paul Sarkarnama
देश

शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात भाजपनं बॉलीवूडमधील हस्तीच उतरवली मैदानात

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : बिहारी बाबू म्हणून ओळख असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आता पश्चिम बंगालच्या राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहेत. आधी भाजप, नंतर काँग्रेस अन् आता तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तिकिटावर सिन्हा लोकसभेच्या मैदानात (Loksabha Election) उतरले आहेत. त्यांना बंगालमधील सनसोल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं तिकीट जाहीर झालं आहे. आता त्यांच्याविरोधात भाजपने बॉलीवूडमधील हस्ती असलेल्या अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांना मैदानात उतरवलं आहे.

अग्निमित्रा पॉल या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि कलाकारांसाठी फॅशन डिझायनिंग केलं आहे. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर वर्षभरातच म्हणजे 2020 मध्ये पक्षाने त्यांच्या भाजप महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षाची जबाबदारी टाकली. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना असनसोल दक्षिण मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता. आता भाजपने त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. बॉलीवूडचा भाग असलेल्या अग्निमित्रा यांचा आता शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी सामना होणार आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ट्विटरवरून शत्रुघ्न सिन्हा यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. सिन्हा यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. मागील वर्षी जुलै महिन्यात ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. पण त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नव्हता. आता ममतांनी त्यांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवत काँग्रेसला धक्का दिला आहे.

बंगालमधील एक लोकसभा व चार विधानसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोल मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांनाही विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. बालीगंज विधानसभा मतदारसंघातून ते तृणमूलचे उमेदवार असतील.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या राजकीय प्रवासाविषयी...

शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसच्या (Congress) तिकिटावरुन पाटणा साहिब मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्याआधी 2009 आणि 2014 मध्ये सिन्हा हे भाजपकडून या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध करीत त्यांनी भाजप सोडली होती. भाजप हा 'वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी' बनला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सिन्हा यांनी 80 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपचे दोन खासदार होते. त्याकाळात सिन्हा हे पक्षामध्ये स्टार प्रचारक म्हणून सक्रीय होते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात त्यांनी अनेक वर्ष हे काम केलं. पण मोदी व शहा यांच्याशी त्यांचे सुर जुळले नाहीत. त्यामुळे 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्यामुळे हा त्यांचा तिसरा पक्ष ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT