Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee : भाजपच्या पहिल्याच उमेदवारी यादीने ममतांना हादरा; पराभव होणार? हुकमी एक्का मैदानात...

BJP candidate list West Bengal : तृणमूल काँग्रेसच्या संपूर्ण प्रचाराची धुरा प्रामुख्याने ममतांच्याच खांद्यावर असणार आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रचारसभा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

Rajanand More

West Bengal Assembly election update : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीने राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना हादरा बसला आहे.

भाजपने राज्यातील पक्षाचे मोठे नेते व विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना थेट दोन मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघांचे कनेक्शन ममता बॅनर्जी यांच्याशी आहे. सुवेंदू अधिकारी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. ममतादीदी या भवानीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

भाजपची खेळी

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. मात्र, अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांना पराभवचा धक्का सहन करावा लागला होता. नंदीग्राम हा अधिकारी यांचा गड मानला जातो. या पराभवानंतर भवानीपूरचे आमदार सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा देत ममतांसाठी जागा रिकामी केली होती.

पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या होत्या. आता भाजपने अधिकारी यांना नंदीग्रामसह भवानीपूरमधूनही उमेदवारी दिल्याने ममतांसमोर मोठे आव्हान उभे करण्यात आले आहे. भाजपची ही आक्रमक रणनीती ममतांसाठी डोकेदुखी वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे. ममतांना राज्यभर प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा रंगली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या संपूर्ण प्रचाराची धुरा प्रामुख्याने ममतांच्याच खांद्यावर असणार आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रचारसभा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. भाजपचे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी तृणमूल काँग्रेसला ममतांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. भाजपने आता तृणमूलच्या या रणनीतीलाच शह देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, भाजपने राष्ट्रीय गीत वंदे मातरम लिहिणारे महान साहित्यिक बंकिम चंद्र चटोपाध्याय यांच्या कुटुंबाशी संबंधित सौमित्र चटोपाध्याय यांनाही उमेदवारी दिली आहे. त्यांना नैहाटी मतदारसंघातून उतरविण्यात आले आहे. पहिल्या यादीत ४१ विद्यमान आमदारांसह तीन माजी आमदारांचा समावेश आहे. माजी खासदार खासदार दिलीप घोष खडगपूर मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावणार आहेत. भाजपच्या फायरब्रँड नेत्या अग्निमित्रा पॉल या आसनसोल दक्षिणमधून रिंगणात असतील. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT