

बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. मतदानाच्या दिवशी महागठबंधनमधील चार आमदारांनी मतदान न केल्याने त्यांच्या मतसंख्येवर थेट परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय जनता दलचे आमदार फैसल रहमान यांनी मतदान केले नाही. तसेच काँग्रेसचे तीन आमदार मनोहर प्रसाद, सुरेंद्र कुशवाहा आणि मनोज विश्वास हेही मतदानासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे महाआघाडीच्या मतांची संख्या 37 वरच थांबली. राज्यसभेच्या निवडणुकीत विजयासाठी 41 मतांची आवश्यकता असते. त्यामुळे या चार आमदारांच्या अनुपस्थितीमुळे महाआघाडीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली. एनडीएच्या सर्व 202 आमदारांनी मतदानात सहभाग घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनडीएचा पाचवा उमेदवार शिवेश कुमार यांच्या विजयाची शक्यता अधिक मजबूत मानली जात आहे. अंदाजानुसार शिवेश कुमार यांना सुमारे 38 मते मिळू शकतात, तर राष्ट्रीय जनता दलचे उमेदवार एडी सिंह यांना सुमारे 37 मते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मतदान संपल्यानंतर काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मतमोजणी ही फक्त औपचारिक प्रक्रिया आहे निकाल आधीच लागला आहे, असा दावा एनडीएच्या नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, ओडिशामध्येही राज्यसभा निवडणुकीदरम्यानही काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाऊन क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे तीन आमदार भारतीय जनता पक्ष समर्थित उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचे सांगितले जात आहे.
बिहार आणि ओडिशा या दोन्ही राज्यांतील या घडामोडींमुळे राज्यसभा निवडणुकीत राजकीय रणनीती आणि अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या अंतिम निकालाकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.