Shivraj Singh Chouhan statement : केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी मध्य प्रदेशातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. बुधनी विधानसभा मतदारसंघातील कोसमी गावातील अनेक लोकांच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात आला आहे. या कारवाईविरोधात स्थानिकांनी आंदोलन केले. शिवराज सिंह चौहान स्वत: या आंदोलनात सहभागी झाले. तसेच कारवाईची त्यांनी पाहणीही केली.
बुलडोझर कारवाईवर बोलताना केंद्रीय मंत्री चांगलेच संतापले होते. त्यांनी आपल्या मतदारसंघात अत्याचाराचा कळस गाठल्याचे विधान केले आहे. एकप्रकारे त्यांनी थेट राज्य सरकारवरच निशाणा साधल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री मोहन यादव आणि शिवराज सिंह यांच्यामध्ये तणाव असल्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आले आहे.
काय म्हणाले शिवराज सिंह चौहान?
शिवराज सिंह चौहान म्हणाले, मतदारसंघात अत्याचाराचा कळस झाला आहे. आज सकाळपर्यंत आनंदित असलेल्या घरांमध्ये आता मुलांच्या किंकाळ्यांचा आवाज येत आहे. महिला आक्रोश करत आहेत, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या लोकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली असून त्याचा ढिगारा पिकांवर टाकण्यात आला आहे.
लोकांनी कष्टाने पिकवलेल्या पिकांची नासधूस झाली आहे. विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांना बेघर व्हावे लागले आहे. ही कारवाई करणाऱ्यांची मने कठोर झाली असून त्यांच्यात थोडीही माणुसकी राहिलेली नाही. त्यांना देवही माफ करणार नाही, अशी तीव्र नाराजी चौहान यांनी व्यक्त केली आहे.
पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती दिली जाईल. संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. पुन्हा ते असे कृत्य करण्याचे धाडस ते करणार नाहीत, असेही चौहान म्हणाले. दरम्यान, चौहान यांच्या या विधानावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी चौहान यांना उद्देशून म्हटले आहे की, तुमचे शब्द शपथपत्र आहेत. मध्य प्रदेश बेलगाम झाल्याचा हा पुरावा आहे. पण केवळ बोलून चालणार नाही. आदिवासी कुटुंबांना उघड्यावर आणणारा कोण आहे, हे जनतेसमोर यायला हवे. सरकारी अत्याचार कुठून नियंत्रित होत आहे, हे समोर यायला हवे, असे पटवारी यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.