Narendra Modi - Rahul Gandhi  Sarkarnama
देश

मोदी-शहांच्या राज्यात भाजप मालामाल; काँग्रेसवर मात्र कर्जाचे ओझे

BJP Rich party in country : भाजप ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष...

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : गेली सात वर्षे दिल्लीचे तख्त हाती राखणारा भारतीय जनता पक्ष २०१९-२० या आर्थिक वर्षांतही देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला असून या पक्षाची केवळ घोषित संपत्ती ४ हजार ४८७.७८ कोटी रूपये आहे. त्यापाठोपाठ बहुजन समाज पक्षाचा दुसरा नंबर लागतो. पण बसप आणि भाजपमध्ये मोठे अंतर असून बसपाची संपत्ती ६९८.३३ कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ देशात अनेक वर्ष सत्तेवर राहिलेल्या कॉंग्रेसचा नंबर लागतो. कॉंग्रेसची केवळ घोषित संपत्ती ५८८.१६ कोटी रुपये इतकी आहे.

देशातील ४४ प्रादेशिक पक्षांत उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाची संपत्ती ५६३.४७ कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ तेलंगण राष्ट्र समितीने ३०१.४७ कोटींची तर अण्णाद्रमुकने २६७.६१ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. शिवसेनेने आपल्याकडे १४८.४६ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. असे मिळून २०१९-२० या आर्थिक वर्षांत देशातील ७ राष्ट्रीय पक्षांनी ६ हजार ९८८.५७ कोटी रुपये आणि ४४ प्रादेशिक पक्षांनी २ हजार १२९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या ताज्या अहवालातून देशातील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडील एकूण घोषित संपत्तीची व देण्यांची ही घोषित केलेली माहिती मिळाली आहे. राजकीय पक्षांकडील एकूण संपत्तीमध्ये त्यांच्याकडील जमिनी, मालमत्ता, रोख रक्कम, बँकेमधील शिल्लक, मुदत ठेवींमध्ये गुंतवलेले पैसे आदींचा समावेश आहे. भाजपने एफडी मध्ये ३ हजार २५३ कोटी तर बसपाने ६१८.८६ कोटी रूपये गुंतवले आहेत. कॉंग्रेसने २४०.९० कोटींची एफडी ठेवली आहेत.

आपल्याला देणग्या कोणाकडून मिळाल्या, कर्जे व देणी कोणाकडून घेतली वा कोणास दिली आदींबाबतचे आयकर विवरण देण्याचे काही अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी टाळले आहे. आपल्यावरील देणी व कर्जे यांचा तपशील ज्यांनी दिला त्यात ७ राष्ट्रीय पक्षांवरील कर्जे व देण्यांची रक्कम ७४.२७ कोटी आहे. यात उधारीवर घेतलेल्या ४.२६ कोटी व अन्य मार्गांनी घेतलेल्या देण्यांची रक्कम ७०.०१ कोटी आहे.

कॉंग्रेसला ४९.५५ कोटी रुपये देणं चुकवायचे आहे तर तृणमूल कॉंग्रेसला ११.३२ कोटी रूपयांचे देणी चुकते करायचे आहेत. भाजपच्या बाबतीत कर्जे घेणे व देणी चुकविणे यांचा प्रश्नच नसल्याचे चित्र या अहवालातून दिसते. प्रादेशिक पक्षांमध्ये तेलगू देसम पक्षला ३०.३४२ कोटी, द्रमुकला ८.०५ कोटी रुपये देणी चुकवण्याचे ओझे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT