नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सध्या तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. पराभवाच्या भीतीनं भाजपनं हा निर्णय घेतल्याची टीका तृणमूल काँग्रेस (TMC) कडून केली जात आहे. तसेच या निवडणुकीत आमदार फुटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
टीएमसीचे नेते पार्थ चॅटर्जी यांनीच तसे संकेत दिले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याच्या भाजपच्या निर्णयावर टीका करताना चॅटर्जी म्हणाले, 'भाजपमधून आणखी 10 आमदार फुटण्याची भीती त्यांना आहे. ते (सुवेंदू अधिकारी) केवळ ट्विट करत आहेत. त्यांनी मैदानात उतरायला हवं.' असं म्हणत चॅटर्जी यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमधून तृणमूलमध्ये येणाऱ्या नेत्यांची रांग अद्याप संपलेली दिसत नाही. मागील आठवड्यात खासदार बाबूल सुप्रियो पक्षात दाखल झाले आहेत. त्याआधी चार आमदारांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आता राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही पक्षाच्या उमेदवाराविरोधात काही आमदार मतदान करण्याची भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवार दिला जाणार नाही, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवरून उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे. भाजप उमेदवार देणार नाही. निकाल आधीच ठरलेला आहे. आमचं संपूर्ण लक्ष्य आता मुख्यमंत्री यावेळी निवडून येणार नाहीत, यावरच असेल, असं अधिकारी यांनी म्हटलं आहे.
तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुष्मिता देव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारच दिला जाणार नसल्यानं त्या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच देव या काँग्रेसमधून तृणणूलमध्ये दाखल झाल्या आहेत. तृणमूलचे नेते मानस भूनिया हे विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर देव यांना संधी देण्यात आली आहे.
तृणमूलकडे राज्यसभेच्या 16 पैकी 11 जागा आहेत. तर काँग्रेसकडे दोन आणि डाव्या पक्षांकडे एक जागा आहे. मागील आठवड्यात तृणमूलच्या नेत्या अप्रिता घोष यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं ही जागाही सध्या रिक्त आहे. भाजपने 9 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीतही उमेदवार दिला नव्हता. त्यामुळं तृणमूलचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.