New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर चोवीस तासांत भाजपला (BJP News) दोन धक्के बसले आहेत. आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या अभिनेत्याने निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता तिकीट कापण्यात आल्यानंतर दिल्लीतील बड्या नेत्याने थेट राजकारणातूनच संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एकाच दिवसांत भाजपला दोन धक्के बसले आहेत.
भोजपुरी अभिनेते पवन सिंह (Pawan Singh) यांना भाजपने पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर काहीवेळातच माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले आहे.
हर्षवर्धन हे दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) त्यांच्याजागी प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच हर्षवर्धन यांनी एक्स हँडलवर भलीमोठी पोस्ट लिहून राजकारणातून बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. आता पूर्ण आरोग्य क्षेत्रातच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणतात हर्षवर्धन?
तीस वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये लढलेल्या सर्व पाच विधानसभा (Assembly) आणि दोन लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. पक्षसंघटन आणि केद्र सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले. आता माझ्या मुळ कामांकडे वळणार आहे. तत्कालीन आरएसएस (RSS) नेतृत्वाच्या आग्रहाखातर मी राजकारणात आलो. गरिबी, आजार आणि अज्ञान या आमच्या तीन मुख्य शत्रुंशी लढा देणे, हा माझ्यासाठी राजकारणाचा अर्थ होता, असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हर्षवर्धन यांनी पुढे लिहिले आहे की, मी दिल्लीत आरोग्य मंत्री आणि दोनदा केंद्रात आरोग्य मंत्री म्हणून काम केले. हा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. सुरूवातीला मला पोलिओमुक्त भारत बनविण्याच्या दिशेने काम करण्याची आणि नंतर कोरोना (Covid 19) काळात देशवासियांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संधी मिळाली.
आता मी वाट पाहू शकत नाही. खूप लांब जायचे आहे. माझे स्वप्न आहे, त्यासाठी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत राहतील. माझे कृष्णा नगर येथील ईएनटी क्लिनिकही माझी वाट पाहत आहे, असे म्हणत हर्षवर्धन यांनी आपण आता पूर्णवेळ वैद्यकीय व्यवसायात राहणार असल्याचे संकेत दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.