भाजपची सत्ता असलेल्या आसाममध्ये पक्षाला विधानसभा निवडणुकीआधी मोठा झटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी पार पाडलेले, चारवेळेचे खासदार राजेन गोहेन यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासोबत भाजपमधील 17 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
आसाममध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी राज्याचे दौरे वाढवले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपमधील बड्या नेत्यांपैकी एक असलेल्या गोहेन यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर हा पहिला मोठा झटका आहे. गोहेन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
74 वर्षीय गोहेन हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी नागांव मतदारसंघाचे लोकसभेत चारवेळा नेतृत्व केले आहे. तसेच मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते रेल्वे राज्यमंत्री होते. 2019 पर्यंत ते खासदार होते. मात्र, त्यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. तेव्हापासून ते पक्षात नाराज होते. मागील तीन दशकांहून अधिक काळ त्यांचा पक्षात दबदबा होता.
हिमंता सरमा बिस्वा यांनी 2015 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यांच्यासोबत असलेले मतभेद हेच राजीनाम्याचे कारण असल्याचे संकेत गुरूवारी दिले. सध्या सत्तेत असलेल्या लोकांसाठी आम्ही पक्षात नाही. दुसऱ्या पक्षाचे लोक भाजपमध्ये आल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात असल्याची नाराजी गोहेन यांनी व्यक्त केली.
भाजप आता आसामी लोकांचा सर्वात मोठा शत्रू बनल्याचा गंभीर आरोपही गोहेन यांनी केला. गोहेन हे अहोम समाजातील आहेत. आसाम विधानसभेत 30 ते 40 जागा अहोम समाजाकडून निवडून दिल्या जातात. पण त्यानंतरही असा एकही मतदारसंघ नाही, जिथे हा समाज तिकीट मागू शकतो. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे संपूर्ण समाज विखुरला आहे. या समाजाचा प्रभाव नगण्य झाला आहे, असे गोहेन म्हणाले. गोहेन यांनी पुनर्रचनेच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या आसाम खाद्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.