BJP and Congress  Sarkarnama
देश

भाजपला धक्का; आमदारकीचा राजीनामा दिलेल्या दोन बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर त्रिपुरात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राज्यात 2018 मध्ये भाजपला (BJP) सत्ता मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असलेल्या नेत्याने सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या नेत्यासह समर्थक माजी आमदाराने काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला.

त्रिपुरामध्ये भाजपला खिंडार पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्रिपुराचे (Tripura) माजी आरोग्य मंत्री सुदिप रॉय बर्मन (Sudip Roy Barman) आणि आशिष कुमार साहा (Ashish Kumar Saha) यांनी सोमवारी आमदारकीचा राजीनामा देत भाजपलाही रामराम ठोकला होता. त्यानंतर ते लगेचच दिल्लीला रवाना झाले. दोघेही काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

त्यानुसार मंगळवारी सकाळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बर्मन यांच्या प्रवेशामध्ये त्रिपुरात काँग्रेसची ताकद वाढली आहे. मागील काही दिवसांपासून बर्मन हे सातत्याने मुख्यमंत्री विप्लव कुमार देव (Biplav Kumar Dev) यांच्यासह सरकारवर टीका करत आहेत. राज्यात लोकशाही नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले होते.

बर्मन यांनी काही दिवसांपुर्वीच काँग्रेसच्या नेत्यांची गुप्त भेट घेतली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्मन व साहा यांच्यासह आणखी काही आमदार त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. भाजपमधील बंडखोर आमदार नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊ शकतात. बर्मन व साहा यांनी काही दिवसांपासून उघडपणे पक्षाविरोधा बंड पुकारलं होतं. त्यांनी त्रिपुरातील विविध भागांत जाऊन लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते व पक्षातील पदाधिकारीही उपस्थित होते. बर्मन यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर यापूर्वी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपचे राज्यात 36 आमदार आहेत. आता हा आकडा 33 वर आला आहे. बर्मन आणि साहा यांच्याआधी एका आमदारानेही भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडे आता बहुमताच्या आकड्यापेक्षा केवळ दोन आमदार अधिक आहेत. त्यामुळे पुढीलवर्षी निवडणुकीपर्यंत बर्मन यांच्याकडून सरकार अल्पमतात आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. कारण 10 आमदार मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या महत्वाच्या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामध्ये बर्मन यांचाही समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT