Devendra Fadnavis and Nitesh Rane
Devendra Fadnavis and Nitesh Rane  Sarkarnama
देश

नितेश राणे दिसताच फडणवीस म्हणाले, ऑल दी बेस्ट!

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जामिनावर सुटका झाली आहे. राणेंची सुटका होताच त्यांनी थेट गोवा (Goa) गाठले आहे. त्यांनी गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभेला हजेरी लावली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत त्यांनी बंद दाराआड चर्चा केली. ऑल दी बेस्ट, असे म्हणत फडणवीसांनी राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत. (Nitesh Rane Updates)

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 10 फेब्रुवारीला गोव्यात सभा झाली. या सभेला नितेश राणे यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले नितेश राणे शेवटच्या रांगेत बसले होते. राणे शेवटच्या रांगेत बसल्याचे विरोधी पक्षनेते व गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेच तेथील कार्यकर्त्यांना सूचना करुन राणे यांना पहिल्या रांगेत जागा उपलब्ध करुन दिली.

मोदींची सभा संपताच राणेंनी फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीसांनी राणेंशी हस्तांदोलन करीत त्यांना ऑल दी बेस्ट म्हटले. नंतर राणेंनी फडणवीसांशी खासगीत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मग दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणेंची अटक या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. याचबरोबर राणेंची प्रकृती आणि न्यायालयीन कार्यवाही यावरही त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भेटीनंतर राणे म्हणाले की, या संपूर्ण काळात फडणवीस आमच्यासोबत उभे होते. त्यामुळे त्यांची भेट घेणे हे माझे कर्तव्य आहे. मोदींची सभा असल्याने कार्यकर्त्या म्हणून मी उपस्थित होतो. काळ सर्वांना उत्तर देईल, असे मला फडणवीसांनी सांगितले आहे.

नितेश राणेंना या जामीन मंजूर करतानाही न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. न्यायालयाने राणेंना कणकवली तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत. आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, अशाही अटी घालण्यात न्यायालयाने घातल्या आहेत.

नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याने आणि मणक्याचा त्रास असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग विभागात उपचार सुरू होते. राणेंचा त्रास आणखी वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. या पथकात हृदयरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार होती. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तातडीने नितेश राणेंना रुग्णालयाचून डिस्चार्ज घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT