Manipur BJP News  Sarkarnama
देश

BJP MLA News : भाजपा सरकारवरून लोकांचा विश्वास उडाला; आमदारांनी थेट दिल्लीत जाऊन व्यक्त केली खंत!

Manipur Violence News : गेल्या दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Manipur BJP News : गेल्या दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. त्यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. आता तर भाजपच्या आमदारांनीच दिल्लीमध्ये येवून पंतप्रधान कार्यालयाला पत्र सादर केले आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपाचे सरकार आहे. हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर मैतेई समाजाचे भाजपाचे (BJP) नऊ आमदार आणि मणिपूर सरकारला पाठिंबा देणार्‍या एका अपक्ष आमदाराने पंतप्रधान कार्यालयाला भेट दिली. 'जनतेचा भाजप सरकारवरील विश्वास उडाला असल्याचे' निवेदन १९ जूनला सादर केले. पंतप्रधान कार्यालयाला निवेदन देत असताना त्याच दिवशी मणिपूरमधील इतर ३० आमदारांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

या आमदारांमध्ये एनपीपी आणि जेडीयू पक्षाच्या आमदारांचाही समावेश होता. या दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळाबाबत बोलताना निशिकांत सिंह सपम यांनी सांगितले, पक्षामध्ये कोणतेही गटतट नसून आमचा पक्ष एकसंध आहे. विसंवाद झाल्यामुळे दोन वेगवेगळी शिष्टमंडळे आली आहेत.

राज्यात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे १०० हून अधिक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले, तरी प्रत्यक्षात सुधारणा झालेली नाही. कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असे निवेदन पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील माणसाला शांतता हवी आहे. सध्या लोकांचा विद्यमान सरकारवर विश्वास नाही. प्रशासनाने काही विशेष उपाययोजना राबवल्या आहेत. सरकारने कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. तरच सामान्य लोकांचा विश्वास आपण परत मिळवू शकू, असे या आमदारांनी पत्रात म्हटले आहे.

आमचे म्हणणे निवेदन स्वरूपात पंतप्रधान कार्यालयाला दिले आहे. त्यानंतर मला कळले की, विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणखी एक शिष्टमंडळ दिल्लीत आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या भेटीसाठीच्या यादीत आमचे नाव नसल्यामुळे आम्ही त्या बैठकीला गेलो नाही, असेही या आमदारांनी सांगितले, असे वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस' ने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT