Kangana Ranaut Sarkarnama
देश

Kangana Ranaut : शेतकरी आंदोलनाने बांगलादेशसारखी स्थिती झाली असती! कंगनाला भाजपने सुनावले

Rajanand More

New Delhi : भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी शेतकरी आंदोलनामुळे पंजाबची स्थिती बांग्लादेशसारखी झाली असती, असे विधान केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

कंगना यांच्या या विधानावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत फटकारले आहे. कंगना यांनी शेतकऱ्यांवर बोलू नये. अशा विधानांपासून त्यांनी लांबच राहायला हवे, असे म्हणत भाजप नेत्यांनी कंगना यांना सुनावले आहे. यावरून काँग्रेसनेही सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या आहेत कंगना?

एका मुलाखतीत बोलताना कंगना म्हणाल्या की, देशाचे नेतृत्व कमजोर असते तर भारतात बांग्लादेशसाऱखी स्थिती निर्माण झाली असती. शेतकरी आंदोलनादरम्यान काय झाले, हे सर्वांनी पाहिले. आंदोलनाच्या नावाखाली हिंसा पसरवण्यात आली. तिथे बलात्कार होत होते. लोकांना मारून लटकवले जात होते.

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना कंगना म्हणाल्या, कृषी कायदे मागे घेण्यात आले त्यावेळी उपद्रव पसरवणाऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांचे प्लॅनिंग खूप मोठे होते, असे म्हणत कंगना शेतकरी आंदोलनाला परदेशातून मदत मिळत असल्याचा थेट आरोप केला आहे.

भाजपचा दुरावा

पंजाब भाजपचे नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगनाच्या विधानाला त्यांचे वैयक्तिक विधान असल्याचे सांगितले. शेतकऱ्यावर बोलणे हा कंगना यांचा विभाग नाही. ते कंगना यांचे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांचे हित पाहणारे आहेत. कंगना यांनी अशी विधाने करायला नकोत. त्यांनी अशा विधानांपासून दूर राहायला हवे, असे ग्रेवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी कंगना यांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार केल्याचे समजते.

काँग्रेसचा पलटवार

कंगना यांच्या विधानांवर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. पजाब काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राज कुमार वेरका यांनी कंगना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणे आणि एनएसएमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. कंगना यांनी पंजाब आणि शेतकऱ्यांना बदनाम केले आहे. त्यांना डिब्रूगढ जेलमध्ये पाठवायला हवे, असे आवाहन वेरका यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT