New Delhi : जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दोन काश्मिरी पंडितांसह एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. या यादीत तिन्ही टप्प्यांतील उमेदवारांचा समावेश आहे.
राज्यात भाजपकडून कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्यात आलेली नाही. मात्र, काही अपक्षांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. राज्यात 90 जागा असून त्यापैकी 44 जणांची यादी सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आली आहे.
ही निवडणूक तीन टप्प्यांत होणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पहिल्या टप्प्यातील 15, दुसऱ्या टप्प्यातील 10 आणि तिसऱ्या टप्प्यातील 19 उमेदवारांचा समावेश आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये अनुक्रमे 24, 26 आणि 40 जागांवर मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखा 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा असून ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
भाजपने शंगस-अनंतनाग पूर्व मतदारसंघातून वीर सराफ आणि हब्बाकदल मतदारसंघातून अशोक भट्ट या काश्मिरी पंडितांना उमेदवारी दिली आहे. तर किश्तवाड मतदारसंघातून शगून परिहार या महिला उमेदवार असतील. पहिल्या यादीत त्या एकमेव महिला आहेत.
माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष निर्मल सिंह यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. 2014 मध्ये त्यांनी बिलावर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांच्या जागी सतीश शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांचेही पहिल्या यादीत नाव नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत तरी त्यांचे नाव असणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे बंधू देवेंद्र राणा यांना भाजपने तिकीट दिले आहे. ते नागोटा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. देवेंद्र राणा हे नॅशनल कॉन्फरन्समधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपमधील घराणेशाहीची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.