Kangana Ranaut Gandhi family death remarks : गांधी कुटुंबाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर केलेल्या विधानांवर तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविषयीच्या उल्लेखांवर आक्षेप घेत ही तक्रार करण्यात आली आहे.
भाजप (BJP) कंगना राणावत यांनी 10 नोव्हेंबरला त्यांच्या अधिकृत 'X' खात्यावर गांधी कुटुंबाशी संबंधित एक जुना व्हिडीओ आणि काही पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टमध्ये इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूंचा संदर्भ देत सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासाबाबत सूचक विधान करण्यात आल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. सोनिया गांधी यांचा उल्लेख 'रहस्यमय परदेशी नागरिक' असा करण्यात आल्याचाही तक्रारीत दावा आहे.
विशेष म्हणजे कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथील खासदार आहेत आणि तक्रारदार हिमाचल प्रदेशचाच शिमल्यातील रहिवासी आणि निवृत्त कॅप्टन अतुल शर्मा आहेत. त्यांनी 12 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशच्या पोलिस (Police) महासंचालकांकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती.
संबंधित पोस्टमुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात. तसेच सार्वजनिक शांतता आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचू शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली. सोशल मीडियावरील पोस्टची सत्यता, संदर्भ आणि डिजिटल प्रसार यांची सायबर फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली.
या तक्रारीच्या आधारे शिमला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 196, 353 आणि 356 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कलमे विविध गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवू शकणारी विधाने आणि मानहानीशी संबंधित आहेत.
शिमल्याचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सोशल मीडिया पोस्टची सत्यता आणि त्यातील मजकुराची कायदेशीर बाजू तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.