भाजपमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांना पत्र पाठवत राष्ट्रीय प्रवक्तेपदासह पक्षाच्या सक्रिय प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेत असल्याचे पूनावाला यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.
शहजाद पूनावाला यांनी राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही शेअर केले आहे. यापूर्वी 30 जुलै रोजी त्यांनी भाजपमधील सर्व पदे आणि प्राथमिक सदस्यत्व सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा तत्काळ स्वीकारला नव्हता. त्यांना निर्णयाचा पुन्हा विचार करण्यास सांगण्यात आले होते.
नव्या पत्रात पूनावाला यांनी आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीचा राजीनाम्यामागील प्रमुख कारण म्हणून उल्लेख केला आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केल्यानंतर आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांतील काही घटना आणि काही व्यक्तींशी संबंधित परिस्थितींमुळे आपला निर्णय आणखी पक्का झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या व्यक्तींची नावे किंवा नेमकी काय घटना घडली याचा तपशील त्यांनी दिलेला नाही.
मागील वेळी राजीनामा दिल्यानंतर भाजपने तो तातडीने स्वीकारला नाही आणि पुनर्विचार करण्यास सांगितले. पक्षाच्या या भूमिकेमुळे आपण भावूक झालो आणि पक्षाने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञ असल्याचे पूनावाला यांनी पत्रात नमूद केले आहे.
पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष नितिन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संघटन महामंत्री बीएल संतोष यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. गेल्या 5 वर्षांत पक्षाने आपल्याला व्यासपीठ आणि अनेक संधी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपपासून दूर होत असले तरी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कामाबद्दल तसेच विचारांबद्दल आपला पाठिंबा कायम राहील, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे आता खासगी क्षेत्रात जाण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजीनाम्याच्या पत्राच्या शेवटी पूनावाला यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे, “व्यवस्था छोड़ रहे हैं, व्यक्ति या विचार नहीं.” त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.