Lorho S. Pfoze, Gaurav Goagai Rajkumar Ranjan Singh Sarkarnama
देश

Manipur MP In Parliament: भाजपनं मणिपूरच्याच खासदारांचं तोंड बंद केलं; कोण आहे ते ? गौरव गोगोईंच्या आरोपाने चर्चा

Sunil Balasaheb Dhumal

Delhi News : काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची मंगळवारी जोरदार चर्चा झाली. मणिपूर हिंसाचारापासून महागाईपर्यंतच्या मुद्द्यांवर गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोगोई म्हणाले, "पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलण्यासाठी ८० दिवस का लागले? तेही ३० सेकंदच बोलले. मोदी बोलले नाहीत तसेच भाजपने मणिपूरमधील त्यांच्याच दोन खासदारांनाही हिंसाचारावरून बोलू दिले नाही. यातील एक खासदार केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांनाही मणिपूरवर बोलण्याची संधी मिळाली नाही." (Latest Political News)

मणिपूर हिंसाचारावरून भाजपविरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मणिपूरबाबत मोदी संसदेत येवून निवेदन करत नसल्याने विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाच्या आयुधाचा वापर केला आहे. या ठरावाबाबत मंगळवारी संसदेत 'एनडीए' आणि 'इंडिया'त वाकयुद्ध झाले. यावेळी गोगोईंनी भाजपला झोडपून काढले. तसेच मोदींना मणिपूरवरून तीन प्रश्न विचारले. आता मणिपूरमधील खासदारांना संसदेत बोलू न दिल्याचा आरोप केल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या आरोपानंतर मणिपूरमधील ते खासदार कोण आहेत, याची उत्सुकता लागली आहे.

  • डॉ. राजकुमार रंजन सिंग (Rajkumar Ranjan Singh)

भाजपचे डॉ. राजकुमार रंजन सिंह हे इनर मणिपूर (Manipur) लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत दोन लाख ६३ हजार ६३२ मते मिळवून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे ओयनम नबकिशोर सिंग यांचा पराभव केला. सिंग यांना दोन लाख ४५ हजार ८७७ मते मिळाली. राजकुमार रंजन सिंग यांना आरके रंजन सिंग या नावानेही ओळखले जातात. ७ जुलै २०२१ रोजी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे शिक्षण तसेच परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे.

राजकुमार रंजन सिंह राजकारणात येण्यापूर्वी शिक्षण क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून भूगोल विषयात पी.एचडी. केली आहे. यासोबतच त्यांनी सहाय्यक प्राध्यापक, उपनिबंधक, कुलसचिव अशी पदे भूषवलेली आहेत. राजकुमार रंजन सिंह यांनी २०१२ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी 'यूजीसी अॅकॅडमिक स्टाफ कॉलेज' आणि मणिपूर विद्यापीठात काम केले. २०१३ मध्ये राजकारणात येण्यापूर्वी ते मणिपूर विद्यापीठाच्या भूगोल विभागात 'व्हिजिटिंग फेलो' होते. त्यांच्या नावावर आठ पुस्तकेही आहेत.

  • लोर्हो एस फोजे (Lorho S. Pfoze)

नागा पीपल्स फ्रंटचे लोर्हो एस. फोजे हे बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत फोजे यांनी भाजपच्या हौलीम एस.एम. बेंजामिन यांचा पराभव केला. फोजे यांना एकूण तीन लाघ ६३ हजार ५२७ मते मिळाली. तर भाजपच्या बेंजामिन यांना दोन लाख ८९ हजार ७४५ मते मिळालेली आहेत.

संसदेत मणिपूरबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असूनही आरके रंजन आणि फोजे यांना भाजपने बोलू दिले नसल्याचा गंभीर आरोप गोगईंनी केला आहे. मोदींना विचारलेल्या तीन प्रश्नांनंतर गोगईंनी केलाला हा आरोपाने भाजपवर टीका होऊ लागली आहे. पंतप्रधान मोदी मणिपूरला जात नाहीत, संसदेत बोलत नाहीत तर स्थानिक खासदारांनाही बोलू दिले जात नाही, असा आरोप होऊ लागला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT