नवी दिल्ली : राज्याच्या विधान परिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज रात्री उशिरा 5 उमेदवारांची घोषणा केली. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे पुनर्वसन नागपूरमधून करण्यात आले असून भाजपवासी झालेले माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांना धुळे - नंदुरबार मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उमेदवारांची घोषणा केली. कर्नाटकात वीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
राज्यातील पाच जागांवरील भाजप उमेदवार असे : मुंबई राजहंस सिंह, अकोला बुलढाणा वाशिम वसंत खंडेलवाल, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, धुळे-नंदुरबार अमरिशभाई पटेल, आणि कोल्हापूर अमोल महाडिक.
बावनकुळे यांचे तिकीट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत कापले होते. बावनकुळे यांची ओळख विदर्भातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अशी आहे. कामठी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली व त्यानंतर सलग तीनदा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2015 मध्ये भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यावर त्यांना ऊर्जा हे महत्त्वाचे खाते मिळाले. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक तत्कालिन मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा जाहीरपणे केले. निवडणुकीच्या काळात ऐनवेळी पत्ता कट करण्यात आला.
त्यांनी या विषयावर मौन बाळगले. बावनकुळे यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल जाहीरपणे न बोलण्याचा संयम दाखविला. त्यानंतर त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. ओबीसी आंदोलन असो की नागपूरमधील स्थानिक निवडणुका यात ते सक्रिय राहिले. ते दिल्लीत अनेकदा गडकरी यांची भेट घेण्यास येत असतात. बावनकुळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचेही पुनर्वसन या निमित्ताने भाजपने केले आहे.
पटेल हे धुळे-नंदुरबार पट्ट्यातील वजनदार नेते आहेत. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ते राज्याचे शिक्षणमंत्री होते. काॅंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवत ते विधान परिषदेत गेले होते. आता त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.
अकोल-बुलढाणा-वाशिम या मतदारसंघात खंडेलवाल यांनी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळीही जय्यत तयारी केली होती. त्यामुळे त्यांना या निवडणुकीसंदर्भात चांगलाच अनुभव असल्याने भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबत सहमती झाली. खंडेलवाल यांचा सोने-चांदी आभूषण विक्रीचा व्यवसाय असून, शिक्षणक्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. अकोल्यातील शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरीया यांच्या आर्थिक ताकदीपुढे तोडीस तोड उमेदवार देण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे.
मुंबईमध्ये राजहंससिंह यांना संधी देऊन उत्तर भारतीय चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या गटातील राजहंस सिंह तब्बल ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मात्र त्यांनी संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. माजी आमदार असणाऱ्या सिंह यांनी मुंबई महापालिकेत आठ वर्षे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली होती. राजहंससिंह यांना अचानक उमेदवारी मिळाल्याने आधीपासून चर्चेत असलेल्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची संधी हुकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.