DK Shivakumar  Sarkarnama
देश

DK Shivakumar : डझनभर आमदारांची दोन लग्ने? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच उडवून दिली राजकीय वर्तुळात खळबळ; नावे जाहीर करण्याची कर्नाटक भाजपची मागणी

Karnataka MLA Two Marriages Controversy : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी, अनेक आमदारांनी दोन दोन लग्न केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Aslam Shanedivan

Bengaluru News : कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी नुकताच बंगळूरूमध्ये राहणाऱ्या आमदारांबाबत धक्कादायक विधान केले आहे. शिवकुमार यांनी, बाहेरून बंगळूरुला आलेल्या सुमारे डझनभर आमदारांनी "दोन दोन लग्न केली असून त्या आमदारांची संपूर्ण यादीच आपल्याकडे आहे. गरज पडल्यास ती देऊ शकतो, असे म्हटले आहे. ज्यानंतर भाजपकडून यावर टीका होताना दिसत असून निषेध देखील करण्यात आला आहे. तर थेट यादी जाहीर करावी असे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटकच्या विधानसभेत दुष्काळ आणि बंगळूरुच्या वेगाने होणाऱ्या शहरीकरणावर चर्चा सुरू असताना ते बोलत होते.

शहराची लोकसंख्या वाढली

विधानसभेत दुष्काळाच्या परिस्थितीवरील चर्चेला उत्तर देताना शिवकुमार यांनी बंगळूरच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाचा मुद्दा मांडला. यावेळी ते म्हणारले की, केम्पेगौडा यांनी बंगळूरची उभारणी केली. केंगल हनुमंतय्या यांनी विधानसौध उभारले, तर एस. एम. कृष्णा यांनी या शहराला आंतरराष्ट्रीय शहराची ओळख दिली. यामुळेच आज या शहरात येणारा कोणीही पुन्हा परत जात नाही. तर याच कारणाने शहराची लोकसंख्या ३३ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

कोणी परत जात नाही....

तर या शहरात आता जो कोणी येतो तो परत जात नाही अशी स्थिती झाली आहे. येथे येणारे आमदारसुद्धा परत जात नाहीत. शहरात येणाऱ्यांपैकी अनेकांनी दोन दोन लग्न केली आहेत. तर असे करणारे किमान डझनभर आमदार असून मी त्यांची यादी देऊ शकतो, असा दावा शिवकुमार यांनी केला आहे. ज्यात धारवाड, दक्षिण कन्नड आदी जिल्ह्यांतील काही आमदारांची नावे सांगता येतील; पण या प्रकरणात अदिक खोल आपण जाणार नाही असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

ज्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून या वादात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजपने यावर तीव्र संताप व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे. तसेच शिवकुमार यांनी ती यादी जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

याबाबत विधानसभेतील भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, या विधानाला अनावश्यक म्हणत शिवकुमार यांनी ज्यांचा उल्लेख केला त्यांची नावे प्रसिद्ध करावी असे म्हटले आहे. "मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर, बंगळूरुमध्ये बाहेरून आलेल्या प्रत्येक आमदारावर आता संशय घेतला जात असून मी येथेच जन्मलो आणि वाढलो आहे. हे माझे भाग्य असल्याचेही म्हणत त्यांनी शिवकुमार यांच्यावर टीका केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एस. सुरेश कुमार यांनी, मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य गंमतीने जरी केले असले तरी, सभागृहात अशा प्रकारची वक्तव्ये विधानसभेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी असल्याचा आरोप केला आहे. तसेच अशा वक्तव्यामुळे जनतेमध्ये आमदारांच्याबाबत तिरस्कार आणि संशयाचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलेल्या दाव्यानुसार नावे जाहीर करावीत.

दरम्यान भाजपने जरी पलटवार केला असला तरी मुख्यमंत्री शिवकुमार यांनी असे वक्तव्य करून कोणाला निशाण्यावर घेतले आहे? त्यांचा रोष कोणावर आहे? ते आमदार कोण आहेत? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांनी केलेल्या दाव्याने राज्याचे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT