Bihar Politics : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम महिनाभराचा कालावधी उरला आहे. राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपप्रणित एनडीएने कंबर कसली आहे. पण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये ‘तुझं-माझं जमेना’ असे सुरू आहे. त्यात थेट उपमुख्यमंत्र्यांनीच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान करत आगीत तेल ओतले आहे.
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी केलेल्या विधानावरून चर्चांना उधाण आले आहे. सिन्हा यांच्या विधानानंतर बुधवारी भाजप आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील जेडीयूमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर सिन्हा यांना एका व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा करावा लागला आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहताना सिन्हा म्हणाले होते की, ‘बिहारमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता, हीच अटलजींना खरी श्रध्दांजली असेल. त्यानंतरच आपल्या मनातील चलबिचल शांत होईल. आजही जंगलराज लोक बिहारमधील सामाजिक एकोपा बिघडवत आहेत. भारतीय इतिहासात बिहारला महत्वाचे स्थान आहे. आता पुन्हा ती उर्जा जागृत करायला हवी. बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतरही अटल बिहारी वाजपेयींना खरी श्रध्दांजली ठरेल. त्यावेळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान वाटेल, असेही सिन्हा यांनी म्हटले होते.
सिन्हा यांच्या या विधानामुळे बिहारमध्य भाजप स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी उतावीळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असणार का, याबाबतही आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण दिले जात आहे. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर सिन्हा यांनी तातडीने पक्षाच्या दबावाखाली खुलासा केला.
व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा करताना सिन्हा यांनी म्हटले आहे की, नितीश कुमार हे अटलजींचे फेव्हरिट होते. इथे चांगले प्रशासन देण्यासाठी त्यांना पाठवले होते. जंगलराज संपवण्यासाठी 2005 ते 2010 या काळात चांगले काम झाले. एनडीए सरकारने बिहारच्या जनतेला जंगलराजमधून मुक्त केले. भविष्यातही नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच एनडीए सत्तेत येईल, असे सांगायलाही सिन्हा विसरले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.