Harmel Dhiman joins AAP
Harmel Dhiman joins AAP  Sarkarnama
देश

खिंडार पडलेल्या 'आप'चा भाजपला धक्का; बड्या नेत्याला लावलं गळाला

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने आम आदमी पक्षाला (AAP) मोठं खिंडार पाडलं आहे. मागील काही दिवसांत प्रदेशाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर थेट राज्य कार्यकारिणी बरखास्त करण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर आता आपनंही भाजपला (BJP) धक्के देण्यास सुरूवात केली आहे.

आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि संघटन सचिव सतीश ठाकूर आणि उनाचे जिल्हाध्यक्ष इकबालसिंह यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर दोन दिवसांतच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ममता ठाकूर व उपाध्यक्ष सोनिया बिंदल यांच्यासह उद्योक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रवेशानंतर खिळखिळ्या झालेल्या आपला प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करावी लागली. पण या धक्क्यातून सावरत आता आपनेही भाजपला झटके देण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या एसटी मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व हिमाचल प्रदेश भाजपच्या एससी मोर्चाचे उपाध्यक्ष हरमेल धिमण यांनी बुधवारी आपमध्ये प्रवेश केला. आपचे नेते सत्येंद्र जैन यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

दरम्यान, चार दिवसांतच तीन प्रदेशाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने आपला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर पक्षानं मोठं पाऊल उचललं आहे. पक्षाने आता राज्य कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नवी कार्यकारिणी नियुक्त केली जाईल, अशी माहिती पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांनी दिली होती. केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांचा अपमान केल्यानं त्यांनी पक्ष सोडला आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला होता.

हिमाचल प्रदेशमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा रोड शो झाला होता. यानंतर राज्यातील आपमध्ये मोठं वादळ उठलं आहे. केजरीवालांनी कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे पंजाबनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या स्वप्नाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT