Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Rajya Sabha : भाजपने राज्यसभेतील बहुमत गमावले; 4 खासदार निवृत्त झाल्याने होणार कोंडी

BJP President Nominated MP : राज्यसभेमध्ये सरकारला कोणतेही विधेयक मंजूर करून घ्यायचे असेल तर किमान 113 सदस्यांचे पाठबळ आवश्यक असते.

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवत एनडीएने केंद्रात सरकार स्थापन केले असले तरी राज्यसभेतील बहुमत गमावले आहे. राष्ट्रपती नियुक्त चार सदस्य शनिवारी निवृत्त झाल्याने भाजपचे संख्या 86 पर्यंत खाली घसरले आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपची स्थिती झाली आहे.

भाजपला लोकसभेत स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. बहुमतासाठी आवश्यक मॅजिक फिगरच्या जवळपासही भाजप पोहचू शकली नाही. जेमतेम 240 पर्यंत पक्षाचे खासदार निवडून आले. लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपकडे स्वबळावर बहुमत नसले. इथेही एनडीएतील मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन भाजपला सरकार सावरावे लागणार आहे.

राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त राकेश सिन्हा, राम शाकाल, सोनल मानसिंग आणि महेश जेठमलानी हे चार सदस्य शनिवारी निवृत्त झाले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींकडून ही नियुक्ती केली जाते. परिणामी, हे सदस्य राज्यसभेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच उभे राहतात.

आता चार खासदार निवृत्त झाल्याने भाजपचे संख्याबळ 86 पर्यंत खाली आले आहे. तर एनडीएचा आकडा 101 एवढा आहे. बहुमतासाठी 245 पैकी 113 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. एनडीएला आणखी सात नामनिर्देशित खासदारांसह एका अपक्ष सदस्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे एनडीएचा आकडा 107 पर्यंत पोहचतो.

राज्यसभेमध्ये सध्या 225 सदस्य आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे 87 खासदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 26 सदस्य काँग्रेसचे असून तृणमूल काँग्रेसचे 12, आम आदमी पक्ष आणि डीएमकेचे प्रत्येकी दहा खासदार आहेत.

भाजप बहुमतापासून दूर गेल्याने राज्यसभेत कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी जूना मित्र असलेल्या एआयएडीएमके तसेच बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. हे तिन्ही पक्ष सध्या कोणत्याही आघाडीत नाहीत. राष्ट्रपतींकडून चार सदस्यांची नियुक्ती आणि 11 रिक्त जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भाजपला ही कसरत करावी लागणार आहे.

भाजपला 11 पैकी आठ जागा मिळतील, अशी स्थिती आहे. सध्या भाजपला एनडीएतील मित्रपक्षांची 15 आणि इतर 12 मते विधेयके मंजूर करण्यासाठी आवश्यक आहेत. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाचे राज्यसभेत 11 सदस्य आहेत. यापूर्वी त्यांच्या पक्षाने काही मुद्यांवर सरकारला मदत केली होती. मात्र, आंध्र प्रदेशात झालेल्या पराभवानंतर त्यांच्या मदतीची खात्री भाजपला नाही. तर ओडिशातील बिजू जनता दलाचे नऊ सदस्यही भाजपला सहकार्य करणार का, याबाबत साशंकता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT