Patna : केंद्रातील एनडीए सरकारमध्ये किंगमेकरची भूमिका पार पाडणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच भाजपला पहिला झटका देण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत ते एनडीए बाहेरील पक्षाशी आघाडी करून भाजपला टक्कर देऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे.
झारखंडमधील पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आली आहे. त्यासाठी इंडिया आघाडीसह एनडीएनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल एनडीएमध्ये आहे. पण झारखंडमधील भारतीय जनतंत्र मोर्चाचे प्रमुख आणि भाजपचे माजी नेते सरयू राय यांनी नुकतीच नितीश कुमारांशी भेट घेत आघाडीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
राय यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षासोबत आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतल्याचे राय यांनी स्पष्ट केले.
राय हे झारखंडमधील माजी मंत्री असून त्यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकला आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास यांना पराभूत करून त्यांना सर्वांनाच धक्का दिला होता. त्यामुळे अशा स्थितीत ते नितीश कुमार यांच्यासोबत गेल्यास भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
नितीश कुमार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे राय यांनी सांगितले. दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्याबाबत प्राथमिक सहमती झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इतर औपचारिकतांवर लवकरच अंतिम निर्णय होईल, असे सांगत राय यांनी भाजपचे टेन्शन वाढवले आहे.
राय यांच्याबाबत जेडीयूचे नेतेही सकारात्मक असल्याचे दिसते. नितीश कुमार सरकारमधील मंत्री विजय कुमार चौधरी म्हणाले, राय यांनी नितीश कुमारांची भेट घेतली असून निवडणुकीबाबतही चर्चा झाली आहे. दोन नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होते. राय हे नितीश कुमार यांचे खूप चांगले मित्र असल्याचेही चौधरींनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.