BJp Haryana Assembly Sarkarnama
देश

Haryana Assembly : भाजपची पहिली यादी जाहीर! 17 आमदार आणि 8 मंत्र्यांना पुन्हा संधी

Jagdish Patil

Haryana Assembly Elections 2024: भाजपने (BJP) हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 67 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी (ता.4 सप्टेंबर) जाहीर केली आहे. या यादीमध्ये 17 आमदार आणि 8 मंत्र्यांना पुन्हा एकदा पक्षाने तिकीट दिलं आहे. तसेच या यादीत 8 महिलांना देखील संधी देण्यात आली आहे.

मात्र, मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Naib Singh Saini) यांना करनालऐवजी कुरुक्षेत्र लाडवा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तर अनिल विज यांना अंबाला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पंचकुला येथून ज्ञानचंद गुप्ता, जगाधरीमधून कंवर पाल गुर्जर, रतियामधून सुनीता दुग्गल, आदमपूरमधून भव्या बिश्नोई आणि तेजपाल तंवर सोहना मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मतदानाची तारीख बदलली

हरयाणातील (Haryana) सर्व म्हणजे 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. हरियाणातील निवडणूक 1 ऑक्टोबरला होणार होती. तर निकाल 4 ऑक्टोबर रोजी लागणार होता. पण सणासुदीचा काळ लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली. त्यानुसार आता ती 5 तारखेला होणार आहे.

जातीय समीकरण

भाजपने (BJP) पहिल्या यादीत जातीय समीकरणाची खूप काळजी घेतली आहे. या यादीत जाट आणि एससी उमेदवारांना सर्वाधिक तिकीट देण्यात आली आहेत. ओबीसी 9 आणि जाट समाजाच्या 13 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. तर एससी प्रवर्गातून 13 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान, या यादीमध्ये भाजपने 25 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यानुसार, कालका मतदारसंघातून शक्ती राणी शर्मा, शहाबाद येथून सुभाष कलसाना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यांना अभाविपच्या कोट्यातून तिकीट देण्यात आलं आहे. दुसरीकडे माजी मंत्री संदीप सिंह यांचे तिकीट कापून सरदार कमलजीतसिंह अजराणा यांना पिहोवा मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

तर जगमोहन आनंद हे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या करनाल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या 3 चेहऱ्यांना भाजपने पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. भगवान दास, कॅप्टन अभिमन्यू यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धनखड यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT