Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी असल्याचे दिवाळीनंतर निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबरला निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार करण्यात येतो आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये दसरा संपताच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार, या चर्चांनंतर गणपती विसर्जनानंतर राजकीय पक्षांच्या जागा वाटपाला वेग येणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांकडून लवकरात लवकर जागा वाटप करून प्रचारात आघाडी घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
साधारणपणे राजकीय विश्लेषकांकडून अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की, निवडणूक आयोग दसऱ्याच्या नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल आणि 10 ते 16 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
झारखंड विधानसभेची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक एकत्र घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करून झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक एकत्र डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये घेतली जाण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली पाहता महाराष्ट्राची निवडणूक नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार हे गृहीत धरून राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. छोटे पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी, 'प्रहार'चे बच्चू कडू यांच्याकडून तिसऱ्या आघाडीची चाचपणी केली जात आहे. तर, महाविकास आणि महायुतीमधील पक्षांकडून विरोधी पक्षातील दिग्गजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.