Rajasthan and Congress Election : कर्नाटक राज्यातील विजयाने काँग्रेसला नवसंजिवनी मिळाली. काँग्रेसने कर्नाटकमध्ये २२४ पैकी तब्बल १३५ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने पूर्वीच्या भाजप सरकारचे काही कायदे रद्द करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कर्नाटकमधील पराभव भाजपच्या चागंलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले.
आता पाच महिन्यात राज्यस्थानची (Rajasthan) विधानसभा निवडणूक लागणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे सरकार आहे. हे सरकार खेचण्यासाठी कर्नाटकमध्ये काँग्रेसने राबवलेला पॅटर्न राजस्थानमध्ये भाजप राबवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ३१ मे रोजी राजस्थान विधानसभेचे रणसिंग फुंकले आहे. यावेळी मोदी यांनी राजस्थान सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. (Latest Marathi News)
कर्नाटक (Karnataka) राज्यात प्रत्येक विकासकामांच्या टेंडरमध्ये सरकार ४० टक्क्यांपर्यंत 'कमिशन' घेत असल्याचा आरोप ठेकेदारांनी केला होता. हाच भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरत भाजपच्या बोम्मई सरकारवर हल्लाबोल केला होता. बोम्मई सरकार म्हणजे ४० टक्क्यांचे सरकार असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला. 'पे-टीएम'च्या धर्तीवर 'पे-सीएम' मोहीम काँग्रेसने (Congress) प्रभावीपणे राबवली. काँग्रेसच्या या आरोपाचे खंडन करताना भाजपच्या नाकीनऊ आले. यातूनच आम्ही एकहाती सत्ता स्थापन करणार, असल्याचा विश्वास काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केला होता. निकालात जनतेने काँग्रेसच्या बाजून कौल दिल्याचे स्पष्ट झाले.
आता हाच पॅटर्न राजस्थानमध्ये भाजप (BJP) राबवण्याच्या तयारीत आहे. अशोक गेहलोत सरकारवर भाजपच्या वतीने भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले आहेत. भाजपचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह म्हणाले, "अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले आहेत. ९८ टक्के विभागात साधारण ६० टक्के भ्रष्टाचार आहे. राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण २२ टक्क्यांनी वाढले आहे. राज्यात आतापर्यंत पेपरफुटीची १६ प्रकरणे उघडकीस आली आहेत." मोदींच्या दौऱ्यानंतर स्थानिक नेत्यांनीही गेहलोत सरकारला भ्रष्टाचाराचा आरोप करून घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या नाराजीचाही भाजपला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. माजी उपमुख्यमंत्री राहिलेले पायलट यांनी वसुंधरा राजे यांच्या कारकीर्दीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गेहलोत यांच्यावर दबाव आणला. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात मोर्चे काढले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काय योजना आखणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.